भंडारा : सर्वसामान्यांचे आधारवड समजल्या जाणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील शुद्ध पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या दोन आरओमध्ये बिघाड आल्याने गत चार दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. पाण्याशिवाय भागत नसल्याने रुग्णालयातील रुग्ण, नातेवाईक, कर्मचाऱ्यांची चांगलीच परवड होत आहे. बाटलीबंद पाणी विकत आणण्यासाठी गरीब रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना आर्थिक फटका बसत आहे. रुग्णालयातील कर्मचारीही चांगलेच त्रस्त झाले आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना सुविधा देण्याची हमी देत असले तरी चार दिवसांपासून आरओद्वारे पाणीपुरवठा बंद असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना पाण्यासाठी बसस्थानक किंवा इतरत्र धाव घ्यावी लागत आहे. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी फेरफटका मारला असता, नेत्र विभागानजीकचे आरओ दुरस्तीचे काम सुरू होते. तिथे पाणीपुरवठा सुरू झाला होता. मात्र रुग्णालयाच्या प्रवेशद्वारानजूक असलेले आरओ युनिटमधून पाण्याचा थेंबदेखील दिसून आला नाही. रुग्णांचे नातेवाईक हातात पाण्याच्या बाटल्या घेऊन रुग्णालयाबाहेर व काही बाहेरून पाणी भरून आणताना दिसून आले.
या रुग्णालयात ४८२ खाटांची सुविधा आहे. दररोज बाह्यरुग्ण विभागात एक हजार रुग्ण तपासणीसाठी येतात. यातील काही रुग्णांना वॉर्डात दाखल केले जाते. अपघातासह विविध गंभीर आजाराचे रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले जाते. अनेकदा खासगी रुग्णालयात नाकारलेल्या अतिगंभीर रुग्णांना शेवटचा पर्याय म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयातच आणले जाते.
२०१९ मध्ये झाले होते आरओ युनिटचे बांधकाम
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ स्थानिक विकास निधी २०१८-१९ अंतर्गत आरओ युनिटचे शेडसह बांधकाम करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने संकल्प मजूर सहकारी संस्था माटोरा यांना या बांधकामाचे कंत्राट दिले होते. त्या कामाची किंमत २ लाख ९६ हजार ४७४ रुपये आहे. दि. ७ फेब्रुवारी २०१९ रोजी आरओ युनिटचे काम सुरू करण्यात आले होते. शुद्ध व सुरळीत पाणीपुरवठा सुरू असताना मात्र गत चार दिवसांपासून त्यात तांत्रिक बिघाड आला आहे.