राष्ट्रवादी व प्रहार संघटनेच्या आंदोलनाला यश : दोन दिवसात रस्ता दुरुस्तीचे आश्वासन
भंडारा : दुरवस्था झालेल्या करचखेडा नवीन पूल बायपास मार्गाच्या दुरुस्तीसाठी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस व प्रहार संघटनेच्या वतीने करचखेडा पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अर्धा तास वाहतूक थांबलेली असताना पोलीस प्रशासन व संबंधित विभागाचे अभियंता बागडे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. दोन दिवसात बायपास मार्गाची दुरुस्ती करण्यात येईल तसेच नवीन पुलावरून दुचाकी वाहनांना पवानगी देण्याचे आश्वासन मिळाल्याने रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
भिलेवाडा ते करचखेडा मार्गावर जुन्या पुलाजवळ सुरू असलेले नवीन पुलाचे बांधकाम दोन वर्षांपासून अतिशय संथ गतीने होत आहे. वाहतुकीसाठी कच्चा बायपास
मार्ग तयार करण्यात आला. परंतु पावसाळ्यात बायपास रस्त्याची दुरवस्था झाली आहे. चिखल, खोल खड्ड्यांमुळे दुचाकी चालविणेही कठीण झाले असताना नवीन पुलाचा
रस्ता अडवून ठेवण्यात आला आहे.
परिणामी वाहतूकदारांना कमालीचा त्रास होत असल्याने आज राष्ट्रवादीचे नेते रूपेश खवास, कारधाचे सरपंच आरजू मेश्राम व प्रहार संघटनेचे अंकुश बंजारी, अतुल राघोर्ते, करचखेडाचे सरपंच सतदेवताई, उपसरपंच सुभाष उके, सेलोकर, देवा गायधने यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी विविध प्रश्नांचा भडिमार केल्याने प्रशासनाची बोलती बंद झाली होती. काय निर्णय घ्यावा, हे सूचेनासे झाले होते.
आंदोलकांचा रोष वाढण्याची शक्यता लक्षात येताच कारधा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिसाळे यांच्या मध्यस्थीने गोसेखुर्द प्रकल्प विभाग आंबाडी येथील अभियंता बागडे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. दोन दिवसात बायपास मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल, तसेच नवीन पुलावरून दुचाकी वाहनांना वाहतुकीस परवानगी देण्यात आल्याने आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनात मोठ्या संख्येने करचखेडा, भिलेवाडा, बेरोडी, नेरोडी, सुरेवाडा, माटोरा येथील वाहतूकदार व ग्रामस्थ सहभागी झाल्याने कारधा पोलिसांच्या वतीने कडक बंदोबस्त लावण्यात आला होता.
..तर संबंधित कार्यालयाला कुलूप ठोकू
गोसेखुर्द प्रकल्प विभाग आंबाडीचे अभियंता बागडे यांनी दोन दिवसात रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. परंतु प्रशासनाने निष्काळजीपणा
व हयगय केल्यास संबंधित विभागाच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचे तीव्र आंदोलन करण्यात येईल. याची संपूर्ण जबाबदारी त्या विभागांच्या अधिकाऱ्यांची राहील, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते रूपेश खवास, माजी जि. प. सदस्या ज्योती खवास, कारधाचे सरपंच आरजू मेश्राम, प्रहार संघटनेचे अंकुश बंजारी, अतुल राघोर्ते, करचखेडा ग्रामपंचायतीचे सरपंच सतदेवे ताई, उपसरपंच सुभाष उके, सेलोकर, देवा गायधने व ग्रामस्थ तसेच परिसरातील वाहतुकदारांनी दिला आहे.