ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करण्याची जबाबदारी परिवहन विभागाची आहे. राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांची आरटीओकडून नियमित तपासणी केली जाते; परंतु राज्य आणि जिल्हा मार्गावर धावणाऱ्या वाहनांची कधीच तपासणी होत नाही. आरटीओची जबाबदारी असली तरी रस्ता दुरुस्तीचा भुर्दंड मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाला सहन करावा लागतो. नागरिकांच्या रोषाचाही सामना याच विभागाला करावा लागतो.
भंडारा जिल्ह्यातून करचखेडा-करडी, विरली-लाखांदूर, तुमसर-रोहा, मोहाडी-रोहा, बपेरा-तुमसर, भंडारा-वरठी, तुमसर-गोंदिया यासह अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. रस्त्याच्या डागडुजीबाबत नागरिक नेहमी आक्रमक असतात; परंतु डागडुजी केल्यानंतरही रस्त्याची अवस्था कायम असते.
बॉक्स
तुमसर-मोहाडीत सर्वाधिक रस्ते नादुरुस्त
भंडारा जिल्ह्यातील सर्वाधिक नादुरुस्त रस्ते तुमसर आणि मोहाडी तालुक्यात आहेत. या तालुक्यात असलेल्या रेतीघाटावर जाणारे रस्ते खाचखडग्यांनी भरलेले आहेत. गावातून जाणाऱ्या राज्य आणि जिल्हा मार्गांची अवस्थाही दयनीय आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर पाणी साचून वाहनांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. यासोबतच अपघाताची मालिकाही कायम असते.