तुमसर : तुमसर - देव्हाडी रस्त्याचे काम करताना डेरेदार वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली होती. त्यानंतर थातूरमातूर वृक्षलागवड करण्यात आली. परंतु, या वृक्षांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष होत आहे. योग्य नियोजनाअभावी हे वृक्ष जिवंत राहण्याची शक्यता कमीच दिसत आहे. संबंधित कंत्राटदाराने दहा वर्ष या वृक्षांची देखभाल, नियोजन करण्याचा नियम आहे.
तुमसर - देव्हाडी या रस्त्याचे चौपदरीकरण काम करण्यात आले. त्यापूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या संख्येने ७० ते ८० वर्ष जुने डेरेदार वृक्ष होते. परंतु, रस्त्याचे काम करताना ही सर्व झाडे कापण्यात आली. रस्त्याचे काम पूर्ण झाले. त्यानंतर पावसाळ्यात संबंधित कंत्राटदाराने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षांची लागवड केली. परंतु, वृक्ष लागवड केल्यानंतर त्याचे संगोपन व देखरेख होताना दिसत नाही. वृक्ष लागवड केल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्यांचे काम करण्यात आले. गवतही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. रस्त्याचे काम करताना तोडण्यात आलेल्या झाडांच्या दुप्पट झाडे रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावण्याचा नियम आहे. वृक्ष लागवडीनंतर सुमारे दहा वर्ष त्या झाडांचे संगोपन व देखरेख करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असते. येथेही रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात आली, परंतु त्यांची देखरेख व संगोपन होताना दिसत नाही. त्यामुळे झाडांची वाढ कशी होणार, हा प्रश्न आहे.