पटेल महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांद्वारे पथनाट्य
भंडारा : स्थानिक जे. एम. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक जनजागृती अभियान शहरभर राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जे.एम. पटेल महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सुंदर पथनाट्य सादर केले. बसस्थानक व गांधी चौक अशा दोन ठिकाणी सादर झालेल्या या पथनाट्याद्वारे सर्वसामान्य नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासंदर्भात माहिती तसेच अपघातापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी कोणती सावधगिरी बाळगावी यासंबंधी जनजागृती करण्यात आली.
हेल्मेटचा वापर, सीट बेल्टचे महत्त्व, वाहन चालविताना मोबाइलचा वापर टाळणे अशा अनेक बाबींवर उचित नाट्यमय प्रसंग उभे करून कलावंतांनी प्रकाश टाकला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी सर्व नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. अनिकेत भारती व भंडारा पोलीस ठाणेदार श्री लोकेश कानसे यांनी वाहतूक नियमांचे पालन केल्याने किती तरी अपघात आपण टाळू शकतो हे पटवून दिले. अपघातापासून बचाव करण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे किती गरजेचे आहे आणि हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, हे सांगितले. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील या वेळी उपस्थित होते.
एका अभिनव उपक्रमात महाविद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी शहरातील कलेक्टर चौक, जिल्हा परिषद चौक, शास्त्री नगर, नागपूर नाका व खामतालाव अशा वर्दळीच्या चौकात वाहतूक नियंत्रकाची जबाबदारी पार पाडली. या वेळी वाहतूक नियम तोडणा-यांना त्यांनी केलेल्या चुकांची ‘गांधींगिरी’द्वारे जाणीव करून देण्यात आली. गुलाबपुष्प व नियमावली देऊन वाहतूक नियम पाळण्याविषयी आग्रह धरला.
हे उपक्रम पोलीस अधीक्षक श्री वसंत जाधव यांचे मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले. प्राचार्य डाॅ. विकास ढोमणे यांनी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आयोजित निबंध स्पर्धा, वाद-विवाद स्पर्धा व पोस्टर स्पर्धेत जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
या उपक्रमासाठी पोलीस वाहतूक निरीक्षक श्री शिवाजी कदम, वाहतूक उपनिरीक्षक श्रीधर शहारे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. कार्तिक पनिकर, निबंधक पी. एल. नंदागवळी, डॉ. श्रीधर शर्मा, प्रा. शैलेश तिवारी, प्रा. भोजराज श्रीरामे, प्रा. प्रशांत वालदेव, प्रा. जितेंद्र किरसाण, डॉ. रोमी बिष्ट, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस कर्मचारी आणि महाविद्यालयाचे कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. या अभिनव उपक्रमाची नागरिकांनी प्रशंसा केली.