लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : राज्य महामार्गाच्या रखडलेल्या कामाने नागरिक त्रस्त झाले असून संतप्त झालेल्या पवनी तालुक्यातील सिंदपुरी (रुयाड) येथील नागरिकांनी बुधवारी रस्ता रोको आंदोलन केले. तात्काळ काम करण्याची मागणी करीत रस्त्यावर ठिय्या दिला. पोलिसांनी हस्तक्षेप करून काही वेळानंतर वाहतूक सुरळीत केली.निलज-पवनी-कारधा या महामार्गाचे काम गत काही महिन्यांपासून सुरु आहे. या कामामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले. परंतु गत काही दिवसांपासून रस्त्याचे काम रखडले आहे. वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात धुळ उडत आहे. रस्त्यालगतच्या घरात राहणे कठीण झाले आहे. वायू प्रदूषणाने श्वसनाचे आजार जडत आहेत. या बाबत गावकऱ्यांनी वारंवार मागणी करूनही कोणत्याच उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. तसेच रस्त्याच्या बांधकामालाही वेग दिला नाही.दरम्यान बुधवारी संतप्त झालेले नागरिक सिंदपुरी टि पॉइंटवर एकत्र आले. त्यांनी भंडारा-पवनी रस्त्यावर नागरिकांनी ठिय्या दिला. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बांधकाम कंत्राटदाराविषयी संताप व्यक्त केला जात होता. या आंदोलनाची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ सिंदपुरी येथे धाव घेतली. त्या ठिकाणी गावकऱ्यांचा मोठा जमाव जमलेला होता. पोलिसांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु केला. परंतु कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून ग्रामस्थांना रस्त्यावरून बाजूला केले आणि वाहतूक सुरळीत झाली.सदर आंदोलन तात्पुरते स्थगीत करण्यात आले असले तरी रखडलेले काम त्वरीत सुरु झाले नाही तर पुन्हा मोठे आंदोलन करण्याचा इशारा सिंदपुरी येथील नागरिकांनी दिला आहे. कारधा-पवनी-निलज रस्त्याच्या बांधकामाने या मार्गावरील गावातील नागरिक त्रस्त झाले असून संताप बाहेर येत आहे.
सिंदपुरी येथे रस्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 6:00 AM
निलज-पवनी-कारधा या महामार्गाचे काम गत काही महिन्यांपासून सुरु आहे. या कामामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले. परंतु गत काही दिवसांपासून रस्त्याचे काम रखडले आहे. वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात धुळ उडत आहे. रस्त्यालगतच्या घरात राहणे कठीण झाले आहे. वायू प्रदूषणाने श्वसनाचे आजार जडत आहेत.
ठळक मुद्देरखडलेले काम : निलज-पवनी-कारधा राज्य महामार्ग