राजू बांते
भंडारा : तुमसर ते भंडारा या रस्त्यावर वर्षभर खड्डे चुकवत प्रवास करणाऱ्यांच्या तोंडातून स्वाभाविकच वाक्य पडत आहेत ‘बेस झाली बाबा निवडणूक आली, असेच नेते येऊ देत या मार्गाने.’ निवडणुकीच्या काळात रस्ते गुळगुळीत झाल्याने सर्वांनाच रस्त्यावरील खड्ड्याने नव्हे, तर आर्श्चयाचा सुखद धक्का बसत आहे.
तुमसर- मोहाडी- भंडारा या मार्गाने वर्षभर खड्डे पडलेले असतात. त्या खड्ड्यांना चुकवत प्रवास करावा लागत असतो. याच खड्ड्यांनी अनेकांची हाडे मोडली, कधी जीवही घेतला; पण सार्वजनिक बांधकाम विभाग जागा होत नाही. पावसाळ्यात खड्ड्यात पाणी, पाण्यात वाहन चालवून प्रवास करणारे शिव्या देत वाहन पुढे नेत घर जवळ करतात; राज्यमार्गाने जाणाऱ्या अनेकांनी हे अनुभवले आहे. पण, मंत्र्यांचा दौरा असला की तत्काळ खड्डे बुजवले जातात. कधी मुरमाने तर कधी डांबर फासून रस्ते नीट केले जातात. मंत्र्यांचा वाहनांना धक्के लागू नये याची किती काळजी प्रशासन घेत असते.
निवडणूक आली की मोठ्या नेत्यांच्या प्रचार सभा होतात याची पूर्वकल्पना प्रशासनाला असते. आपली मंत्र्यांनी कानउघाडणी करू नये, याची भीती बांधकाम विभागाला असते. या भीतीपोटी आधीच सावध भूमिका घेत बांधकाम विभागाचे अधिकारी आपले कार्य चोख बजावत असतात. आताच हेच बघा, स्थानिक स्वाराज्य संस्थांची निवडणूक घोषित होताच मोहाडी- भंडारा मार्गावरील खड्डे, रस्ते डांबराने व्यवस्थित करणे सुरू झाले. या मार्गाने मुंबई, दिल्ली, नागपूर येथील मोठे नेते येणार याची प्रशासनाला कल्पना होती. त्यामुळे अगदी वेगाने रस्ते नीट करण्याचे काम बांधकाम विभागाने घेतले.
आश्चर्य काय, नेत्यांच्या प्रचाराचा दिवस उजाडण्याच्या अगोदरच रस्ते गुळगुळीत करण्यात आले आहेत. पावसाळ्यानंतर लगेच खड्डेभरणी झाली नाही. निवडणूक लागताच बांधकाम विभागाला कशी जाग आली, असे प्रश्न वाहनधारकांच्या मनात येत आहेत. आता तर, मंत्री, मोठ्या पुढाऱ्यांनी नेहमीच या मार्गाने यावे. ग्रामीण भागातील जनता मात्र आपल्या बोलीभाषेत म्हणत आहेत, ‘बेस झालं बाबा निवडणूक आली. रस्ते मस्त बुजले, रस्ता चिकन झाला’, तसेच नेत्यांनी या मार्गाने नेहमीच यावे अशीही देवाला प्रार्थना वाहन चालकांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे.