माहितीनुसार फोर्स वॉरिस फाउंडेशन नावाच्या संस्थेने प्रस्तुत उपक्रम राबविताना सेवाभावी संस्थेच्या नावावर दिलेली ओळख शासनाच्या कुठल्याही आरोग्य धोरणाची संलग्न नसल्याचे दिसते. जिल्ह्यातील ५५ ते ६० डॉक्टरांना सदर प्रकरणात सहभागी केल्याची नोंद असल्यामुळे या डॉक्टरांशी संबंध कुठल्या पद्धतीचे आहेत अशा चर्चांना शहरात उधाण आले आहे. एकीकडे शासन गोरगरिबांना मोफत आरोग्यसेवा मिळावी म्हणून शासकीय रुग्णालयाअंतर्गत प्रामाणिक सेवा देत आहे. रुग्णसेवा देण्याचे फक्त आणि फक्त दहा रुपये नोंदणी कार्डचे घेत असताना या संस्थेचे शंभर रुपये चर्चेचा विषय ठरले आहे.
आरोग्यसेवा करण्याची जबाबदारी असलेल्या शहरातील पाच डॉक्टरांची नावे आरोग्य कार्डवर असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक १०० रुपये देऊन कार्ड बनवित आहेत. दरम्यान, यासंबंधी डॉक्टरांची प्रतिक्रिया घेतली असता सेवाभावी संस्था असल्याचे कारण पुढे केल्याने तपासणीच्या शुल्कात सवलत दिल्या जाईल असे सांगण्यात आले, मात्र आरोग्य कार्डचे १०० रुपये घेण्यात येईल, असे सांगितले नसल्याचे डॉक्टर म्हणाले.
दिनांक २२ जानेवारीला शासकीय आरोग्य कार्डची जाहिरात केल्यामुळे पहिल्याच दिवशी मोठ्या रकमेची नागरिकांची लूट करण्यात आली. ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच दुसऱ्या दिवशी संबंधित भामट्यांनी चालविलेला प्रकार पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आला. सदर प्रकार संपूर्ण जिल्हाभर सुरू असून, मौजा कोंढा कोसरा येथे २५०० आरोग्य कार्ड बनवून देऊन २,५०,००० रुपयांनी सामान्य जनतेला लुटण्यात आल्याचे मजुरीवर काम करणाऱ्या बूथ प्रमुखांनी सांगितले. तसेच जनतेनी चौकशी केली असता शासनाच्या कोणत्याही विभागाकडून परवानगी घेतली नसल्याचे समजते. दरम्यान, संबंधित भामटे यांचा बंदोबस्त त्वरित लावून जिल्हाभर होणारी लूट थांबविण्याची मागणी जनतेनी केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास जिल्हा व जिल्ह्याबाहेर कुटुंब आरोग्य कार्ड बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश होऊ शकतो.