सिंचन विहिरी बाद : ५४ ग्रामपंचायत अंतर्गत काम सुरू, ४७ गावे रेड झोनमध्येप्रमोद प्रधान लाखांदूरउन्हाळ्याच्या दिवसात मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्यामुळे राज्य शासनाच्या राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत लाखांदूर तालुक्यात ५४ ग्रामपंचायतीअंतर्गत विविध कामे सुरू केली आहेत. यात तब्बल ८ हजार मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात मजुराच्या हाताला काम नसते. त्यांच्यावर उपासमारीची पाळी येऊ नये यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध कामे केली जातात. सद्यस्थितीत लाखांदूर तालुक्यात ५४ ग्रामपंचायती अंतर्गत विविध कामे सुरु करण्यात आली आहेत. वृक्ष लागवड, सिंचन विहीर बांधकाम, पांदण रस्ते, सिमेंट रस्ते, भात खाचरे, तलाव खोलीकरण, नाला सरळी करणे, घरकुल बांधकाम तसेच शौचालय बांधकामे यावेळी केली जातात. मजुरीची हमी व गावातीलच कामे असल्यामुळे कामावर प्रत्येकच गावात मजूर आहेत. शासन निर्णयानुसार १८१ रूपये मजुरी ठरली असली तरी कामाच्या निकषानुसार मजुरी ठरत असते. कमी मजुरी मिळत असल्याच्या बोंबा मागीलवर्षी झाल्या होत्या. यावर्षी कामावरील मजुरींना अद्याप मजुरी मिळाली नसल्यामुळे मजुरी किती मिळणार याविषयी मजुरवर्गातून चर्चा ऐकू येत आहे. लाखांदूर तालुक्यात एकुण ७९ गावे तर ६३ ग्रामपंचायती आहेत. यातील ४६ गावाना भुजल सर्वेक्षण विभागाने ‘रेड झोन’ मध्ये अडकविल्याने त्या ४६ गावात राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीचे बांधकाम थांबले आहे. ही गावे कोणत्या कारणामुळे रेडझोन मध्ये गेली याची माहिती शेतकऱ्यांना न कळल्यामुळे हा गुंता वाढतच चालला आहे. रेडझोनमधून आमचे गाव बाद करा, यासाठी काही शेतकऱ्यांनी शासनाकडे मागणी केली. अद्याप १७ गावांमध्ये अजुनही राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे सुरु न झाल्याने मजुरांची ओरड सुरु आहे. झालेल्या कामाची मजुरी लवकरात लवकर मिळावी असे निर्देश आमदार बाळा काशिवार यांनी आढावा बैठकीत दिले होते.
रोहयोने दिला आठ हजार मजुरांना काम
By admin | Published: March 23, 2016 12:42 AM