भंडारा : भारतीय वैदिक कालगणनेनुसार, पंचांग शास्त्राने पावसाळ्याची १२ नक्षत्रे सांगितली आहेत. त्यापैकी रोहिणी व मघा ही पावसाची महानक्षत्रे आहेत. यातील पहिल्या म्हणजे रोहिणी या महानक्षत्राची सुरु वात पंचांगशास्त्रानुसार २४ जून रोजी सायंकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी होत आहे. या नक्षत्राचा कालावधी हा १५ दिवसांचा असून ८ जूनच्या सायंकाळी ५ वाजून ४८ मिनिटापर्यंत हे नक्षत्र राहणार आहे. या नक्षत्राची विभागणी चार चरणात असून प्रत्येक चरण हे साधारणत: पावणेचार दिवसाचे असेल. खरिपाच्या हंगामासाठी मशागतीची सुरु वात खऱ्या अर्थाने याच नक्षत्रापासून सुरु होते. या नक्षत्राच्या पावसाने जमिनीची मशागत करणे सोपे जाते. विशेष म्हणजे रोहिणी नक्षत्राच्या पावसाने जमिनीत वापसा तयार होऊन मृग नक्षत्रातील पेरणीस योग्य असे वातावरण तयार होते. त्यामुळे पेरणी केलेले बियाणे जमिनीत रु जण्यास मदत होते. परिणामी शेतकऱ्यांना पेरणी साधल्याचा असीम आनंद लाभतो. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जीवनात व शेती व्यवसायात या नक्षत्राच्या पावसाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. ग्रामीण शेती संस्कृतीमध्ये पूर्वापारपासून यासाठी एक म्हणही रूढ झाली आहे. ती म्हणजे, ‘पाळणा हाले भावाआधी बहिणीचा, पाऊस येई मृगाआधी रोहिणीचा.’ ही म्हण प्रत्येक कुटुंबाला चपलखपणे लागू पडते. कारण कुटुंबात पहिली मुलगी जन्माला आली तर ती मुलगी संपूर्ण कुटुंबाला पुढे नेते. त्यासाठी ती अहोरात्र झटते. तसेच मृगाआधी रोहिणीचा पाऊस चांगला झाल्यास शेतीची मशागत चांगली होऊन मृग नक्षत्रात पेरणी झालेल्या पिकाचे कमी खर्चात अमाप पीक हाती येते, असा आजवरचा ग्रामीण भागातील वयोवृद्ध शेतकऱ्यांचा अनुभव आहे. पंचांगशास्त्रानुसार यावर्षी रोहिणी नक्षत्राचा पाऊस चांगला होण्याचे संकेत आहेत. सोमवारी ज्येष्ठ शुल्क सप्तमीला सायंकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करीत आहे. या महानक्षत्राच्या प्रवेशवेळी वृश्चिक लग्न मकर नवांशात उदीत आहे. या नक्षत्राचे वाहन म्हैस हे असून हा प्राणी जलप्रिय आहे. या वेळी या महानक्षत्रात पावसाकरिता आवश्यक असलेला चंद्र, सूर्य, स्त्री, पुरूष हा सर्वात चांगला योग साधून आला आहे. ३० मे रोजी शुक्र कर्क राशीत गुरु च्या सानिध्यात येत आहे. वटपौर्णिमेच्या सुमारास चांगली पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. या नक्षत्राच्या तिसऱ्या व चौथ्या चरणात केरळ भागात मान्सूनपूर्व पाऊस होऊन महाराष्ट्रात मुंबई व कोकण किनारपट्टीवर वृष्टी होऊन तापमान थोडे खाली येण्याचीही शक्यता आहे. या नक्षत्रात वारा-वादळ जास्त होऊन नुकसान होण्याचीही संभावना आहे. हे सर्व पावसाबद्दलचे निष्कर्ष पूर्णपणे नक्षत्रकालीन ग्रहिस्थतीवर आधारित आहेत. बदललेल्या हवामानानुसार प्रत्यक्ष काय घडून येईल, हे आजच सांगणे कठीण आहे. (प्रतिनिधी)
पावसाच्या रोहिणी नक्षत्राला सुरु वात
By admin | Published: May 30, 2015 1:02 AM