सुकडी (डाकराम) : अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने सुकडी (डाकराम) व बुचाटोला येथील अनेक घरांचे छत उडाले. चक्रीवादळासह आलेल्या पावसाने काही झोपड्या सुद्धा धराशाही झाल्या. मात्र जीवित हाणी टळली. रविवारी ५ वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या चक्रीवादळ व पावसाने मोठेच थैमान घातले. तिरोडा तालुक्यातील सुकडी (डाकराम) व बुचाटोला येथील काही घरांवरील टिनाचे छत पूर्णपणे उडाले. चक्रधर स्वामी मंदिर परिसरातील घरांचे टिनाचे छत उडाले यात अनिल अंबर गेडाम , श्रीधर उके, फुलन केवल मरस्कोल्हे, भूरे, प्रभा बरवे, मालन मुलताम तसेच बुचाटोला येथील जीवन गणू हाडगे यांचा घरांचा समावेश आहे. सुकडी डाकराम गावातील घरांवरील छत उडाल्यामुळे जवळपास १ ते दीड लाख रुपयांचे नुकसाान झाले आहे. बुचाटोला येथील जीवन हाडगे यांचे टिनाचे छत उडाले. टिव्ही फुटली व पंखा तुटला त्यामुळे अंदाजे २० ते २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. सदर माहिती ग्रामपंचायत सदस्य परमानंद सोमा गभणे यांनी तलाठी एल.एम. पराते यांना दुरध्वनीवरून सांगितले. सोमवार (दि.२७) रोजी सकाळी तलाठी एल.एम.पराते, ग्रामपंचायत सदस्य परमानंद गभणे, कोतवाल गोस्वामी व गावातील काही लोकांनी पंचनामा करुन तसा अहवाल तहसीलदार तिरोडा यांना पाठविला आहे. अचानक आलेल्या चक्रीवादळ व पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत नुकसान ग्रस्तांना त्वरित देण्यात यावे. त्यामुळे त्यांच्या राहण्याची समस्या सुटेल अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. सडक अर्जुनी : सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवणी येथे वादळी वाऱ्याने काही लोकांच्या घरावरील टिनाचे पत्रे उडाले. खोडशिवणी येथील रहिवासी केवलराम मस्के यांच्या राहत्या घरावरील सिमेंटची पत्रे आणि कवेलू उडाले. त्यामुळे त्यांचे जवळपास १ लाख रुपयांचे नुकसान झाले. तलाठी, पोलीस पाटील यांनी पाहणी करून पंचनामा तयार करून तहसीलदारांकडे पाठविला आहे. सोबतच गावातील शामराव इलमकर आणि दिनदयाल पांडे यांच्या घरांचेही वादळाने नुकसान झाले आहे. अनेक आम्रवृक्ष खाली पडले. तर लागलेले आंबेसुद्धा पूर्णत: झडले. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना आंबे विक्रीतून होणारा फायदा यंदा घेता येणार आहे. नुकसानग्रस्तांना शासनाने त्वरित भरपाई देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
वादळाने उडाले घरांचे छत, लाखोंचे नुकसान
By admin | Published: May 29, 2015 12:54 AM