तुमसर पंचायत समितीतील प्रकार : मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांचा निषेधतुमसर : परसवाडा (सि.) येथील प्रभारी मुख्याध्यापकावर प्रशासकीय कारवाई करण्याकरिता जिल्हा परिषद प्रशासन टाळाटाळ करीत आहे असा आरोप करीत गुरुवारी तुमसर पंचायत समितीच्या मासिक सभेत मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांचा निषेध करून १५ मिनिटात सभा बरखास्त करण्यात आली. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मासिक सभा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनविरुद्ध प्रशासन असा वाद येथे सुरु आहे.परसवाडा (सि.) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत कार्यरत प्रभारी मुख्याध्यापक ए.एस. हलमारे यांचेवर चौकशी अहवालानंतर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी पं.स. चे गटनेते हिरालाल नागपुरे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी एस.एल. अहिरे यांचेकडे केली होती. पंचायत समितीच्या मासिक सभेत ठराव घेऊन गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली. यात प्रभारी मुख्याध्यापक ए.एस. हलमारे यांचेवर प्रशासकीय कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली.दुपारी १ वाजता सभा सुरु झाली. अध्यक्षस्थानी उपसभापती शेखर कोतपल्लीवार होते. गटनेते हिरालाल नागपुरे यांनी हलमारे यांच्यावर प्रशासकीय कारवाईत दिरंगाई करण्यात येत असल्याचा आरोप केला. सभागृहात बहुमताने ठराव घेतल्यावर कारवाई न झाल्याबद्दल मासिक सभा बरखास्त करण्याचा ठराव मांडला. सभागृहाने तो बहुमताने पारीत करून अवघ्या १५ मिनिटात सभा गुंडाळली. यासंबधाने नागपुरे यांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. मुख्य कार्यपालन अधिकारी ए.एन. अहिरे यांनी कारवाई करण्याचे आश्वासन त्समिती कार्यालयात येऊन दिले होते. यानंतर ‘सीईओंनी’ शब्द फिरविला. दोन दिवसापूर्वी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी नागपुरे यांना एक पत्र दिले. त्या पत्रात गटशिक्षणाधिकाऱ्यांचा अहवाल योग्य नाही म्हणून संबंधित मुख्याध्यापकावर कारवाई करता येत नाही असे पत्र दिले. यात संबंधित मुख्याध्यापकाला क्लिन चिट देण्यात आली. तत्पूर्वी विभागीय चौकशी करण्याचे आश्वासन मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी गटनेते नागपुरे यांना तुमसरात दिले होते हे विशेष.सभा बरखास्त करण्यात यावी अशा सूचना व ठराव सभापती कविता बनकर, उपसभापती शेखर कोतपल्लीवार, पंचायत समितीचे गटनेते हिरालाल नागपुरे, पं.स. सदस्य मुन्ना पुंडे, शिशुपाल गौपाले, दिनेश सरीयाम, मालीनी वहिले, विमल कानतोडे, गुरुदेव भोंडे, रेखा धुर्वे, साधना चौधरी, अशोक बन्सोड यांनी घेतला. सभेला खंडविकास अधिकारी व्ही.के. झिंगरे, ए.एस. गायधने यांच्यासह सर्व खात्यांचे विभागप्रमुख उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)प्रथम विभागीय चौकशी करू असे सांगितल्यावर क्लिनचिटचे पत्र मला दिले. सभागृहाची येथे दिशाभूल करण्यात आली. राजकीय दबावाखाली येथे वरिष्ठ अधिकारी निर्णय बदलवित असल्याचे दिसते. संबंधित प्रकरण वरिष्ठ लोकप्रतिनिधीपर्यंत पोहचविणार असून मी स्वस्थ बसणार नाही.-हिरालाल नागपुरे, गटनेते, पं.स. तुमसर.
१५ मिनिटांत गुंडाळली सभा
By admin | Published: March 10, 2017 1:32 AM