; वरिष्ठांकडे तकारतुमसर : तालुक्यातील गोबरवाही येथे भारतीय स्टेट बँकची शाखा आहे. सदर शाखेअंतर्गत जवळपास २० किलोमीटर परिसरातील गावे येतात. या शाखेत अनेक ज्येष्ठ नागरिकांचे खाते व इतर ग्राहकांचे हजारो खाते उघडले आहेत. त्यामुळे बँकेत ग्राहकांची वर्दळ असते. तेथील सुरक्षारक्षक प्रवेशद्वाराजवळ ग्राहकांना अडवून त्यांना अनेक प्रश्न करून ज्येष्ठ नागरिक व इतर ग्राहकांना असभ्य वागणूक देऊन हकलून लावत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे.
बँकेचे खातेधारक ज्येष्ठ नागरिक द्वारका रामेश्वर मेश्राम या बँकेत गेल्या असता या सुरक्षारक्षकाने प्रश्नावली करून बळजबरीने त्यांना बॅंकेतून बाहेर जाण्यास सांगितले. तेवढ्यात त्यांची मुलगी आली असता सुरक्षा रक्षकाच्या प्रश्नांची उत्तरे देऊन बँकेत प्रवेश मिळवला. सदर महिला एटीएम जनरेट करण्यासाठी बँकेत गेली होती. एटीएम जनरेट करवून घेण्यासाठी सर्व काऊंटरवर विचारणा केली; परंतु शाखेच्या कर्मचाऱ्यांनी कोणतीही मदत केली नाही. त्यानंतर त्यांच्या मुलीने शाखा व्यवस्थापक यांच्याशी मदत मागण्याचा प्रयत्न केला, परंतु, तेवढ्यात सुरक्षा रक्षक धावून येत उलट सदर महिलेशी गैरवर्तणूक करून अपमानित केले. शाखा व्यवस्थापकानेदेखील सुरक्षा रक्षकाला पाठीशी घालत सदर महिला व त्यांच्या मुलीसोबत असभ्य वागणूक केली. बँकेच्या शाखा व्यवस्थापक व सुरक्षा रक्षकाकडून अशा प्रकारची गैरवर्तणूक होणे हा दैनंदिन भाग झालेला आहे. याकडे बँकेच्या उच्च अधिकाऱ्यांनी दखल घेऊन ग्राहकांशी असभ्य वर्तणूक करणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्याची उचलबांगडी करावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.