वैनगंगा, बावणथडी नद्यांच्या खोऱ्यात असणाऱ्या सिहोरा परिसरात रेती माफिया, मोहफूल दारु गाळप तसेच अन्य अनधिकृत व्यवसायांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. रेतीचे डंपिंग बंद करण्यात आले असून, रेती माफियांच्या वाढत्या साम्राज्याला ‘ब्रेक’ लावण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. याच परिसरात चर्चेत असणारा कोंबड बाजार गेल्या वर्षभरापासून बंद करण्यात आला आहे. या व्यवसायाकरिता मोठा आटापिटा व्यावसायिकांनी सुरु केला होता. परंतु, त्यांचे प्रयत्न व्यर्थ गेले होते. अखेरपर्यंत कोंबड बाजाराला मंजुरी मिळाली नाही. दरम्यान, काही शौकिनांनी हौस पूर्ण करण्यासाठी या व्यवसायाला छुप्या मार्गाने सुरु करण्याचा प्रयत्न केला आहे. या व्यवसायावर पोलिसांची करडी नजर आहे. रेतीचे डंपिंग, कोंबड बाजार बंद करण्यात आल्यानंतर अनधिकृत व्यावसायिकांनी गावाचे शिवारात नव्याने जुगार व्यवसाय सुरु केले आहेत.
रेंगेपार गावाच्या हद्दीत जुगार व्यवसाय सुरु करण्यात आला असता, पोलिसांनी धाड टाकली. यानंतर या जुगाराचे स्थलांतर करताना मांडवी गावाच्या हद्दीत हा जुगार व्यवसाय सुरु झाला आहे. जुगार व्यवसाय गावात सुरु असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे यांना मिळताच धाड टाकण्यात आली. दरम्यान, पोलिसांची धाड पडणार असल्याची माहिती आधीच फुटल्याने अनेक जुगारी पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यामुळे आता या व्यावसायिकांमध्ये पोलिसांची भीती निर्माण झाली आहे. मांडवीचा जुगार व्यवसाय बंद करण्यात आला आहे. यानंतर जुगार माफियांनी नवीन शक्कल लढवत हा व्यवसाय अन्यत्र हलविण्याची तयारी सुरु केली आहे. राज्य मार्गावरील हरदोली गावाच्या हद्दीत जुगार व्यवसाय सुरु करण्यात आला आहे. यामुळे गावातील युवा पिढी दिशाहीन होणार असल्याची भीती गावकऱ्यांमध्ये निर्माण झाल्याने या व्यवसायाला विरोध करण्यात आला आहे. जुगार माफियांना गावकऱ्यांनी हाकलून लावले आहे. गावाच्या हद्दीत समाजविघातक व्यवसायाला थारा नाही, असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतल्याने जुगार माफियांची गोची झाली आहे. यानंतर जुगार माफियांनी नवीन जागेचा शोध घेत रुपेरा गावाच्या हद्दीत बस्तान मांडले आहे. या गावाच्या हद्दीत राजरोसपणे जुगार व्यवसाय सुरु करण्यात आला आहे. दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत याठिकाणी जुगाऱ्यांची झुंबड उडत आहे. हा सारा कारभार छुप्या मार्गाने सुरु आहे. जुगार व्यावसायिकांचे एजंट सिहोरा, हरदोली, डोंगरला, रनेरा गावांच्या बसस्थानकावर पोलिसांच्या वाहनावर बारीक लक्ष ठेवून आहेत.