झाडीपट्टीतील नाटकांना पसंती : उत्सवामुळे कलावंतांना मिळणार उत्पन्नरंजित कांबळे मोहदुरादिवाळी सण उत्सवाचा, आनंदाचा, दिव्यातील उजळणाऱ्या पणतीचा सण. झगमगाट, रोषणाई आणि त्याचबरोबर ग्रामीण भागात सुरु होणाऱ्या मंडई उत्सवाचा सण म्हणजे दिवाळी. पाच दिवसांचा दिवाळी सण आटोपताच मंडई उत्सवाची धामधुम सुरु होणार आहे. परिणामी ग्रामीण भागात जत्रेचा माहोल दिसणार आहे.तसं बघीतले तर दिवाळी उत्सवाची खरी मजा ही ग्रामीण भागात आयोजित होणाऱ्या मंडई उत्सवाची असते. दिवाळी सण सुरु होताच ग्रामीण भागात मंडईला सुरुवात होत असते.मंडईनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमामध्ये सर्वात जास्त झाडीपट्टीतील नाटकांना म्हणजेच संचाच्या नाटकांना प्रेक्षकांची पहिली पसंती असते.त्याचबरोबर तमाशा, दंडारी, गोंधळ, कव्वाली, आमदंगल आणि आंबट शौकीनांसाठी लावणीच्या आड हंगामे आयोजित केले जातात. काही का असोना पण मंडई उत्सवामुळे कलावंतांना त्यापासून मोठ्या प्रमाणात उत्पन्न प्राप्त होते. महिनाभरापासून आयोजक मंडई उत्सवाच्या कामाला लागत असतात. मंडई उत्सवाला डेकोरेशनची मागणी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे महिनाभरापासून डेकोरेशन बुक केले जातात.मंडईला पाहुण्यांचे आदान प्रदान होत असते. नातलग एकमेकांच्या गावी मंडईनिमित्त का होईना पण भेटीगाठी घेत असतात. लहान मुलांपासून तर तरुण, मोठ्यांना मंडईचे खासे आकर्षण दिसून येते. विशेष करून तरुण मुला मुलींना मंडई उत्सव मोठी पर्वणीच घेऊन येणारा ठरतो. मंडई उत्सव तरुण, मुलामुलींसाठी भावी जोडीदाराची निवड करण्याचे एक केंद्रस्थान सुद्धा मंडईला ग्रामीण भागात विशेष असे महत्व दिसून येतो. दिवाळी सण सर्वांसाठी आनंदाचे, उत्सवाचे आणि हर्षोल्लास घेऊन येणारा सण असतो आणि त्यात मंडई उत्सव ग्रामीण नागरिकांसाठी आनंदाची पर्वणीच घेऊन येणारा ठरत असतो. पंधरा ते वीस दिवस चालणाऱ्या मंडई उत्सवाची मजा काही वेगळीच असते हे मात्र विशेष. ग्रामीण भागात मंडईला विशेष महत्व असते. सकाळ सत्रापासून आप्तस्वकीयांचे येणे जाणे सुरु होते. विशेष म्हणजे सोयरकीच्या कामांना विशेष प्राधान्य दिले जाते. दिवाळीचा फटाका फुटताच सुयोग्य वर वधू यांच्या लग्नाचा बार उडविण्याचा बेत आखला जातो. त्यात मंडईच्या बहाण्याने भेटी गाठी वाढविण्यावर भर दिला जातो. त्यातून मोठ्या प्रमाणात संबंध वाढीला लागतात. दरम्यान या उत्सवाच्या माध्यमातून कोट्यवधींची उलाढाल सुद्धा होत असते.
ग्रामीण भागात मंडईची रेलचेल
By admin | Published: November 03, 2016 12:42 AM