भंडारा : युद्धाचा सायरन वाजला की हृदयात धडधड व्हायची. मिसाईल, बॉम्ब वर्षावाच्या धुराने आकाश काळेकुट्ट दिसायचे. कानठाळ्यात बसविणारा आवाज व्हायचा. आपले काय होणार, अशी भीती वाटायची अन् मायदेश भारतभूमीची आठवण यायची, असे युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या तुमसर तालुक्यातील खापा येथील विनोद संतोष ठवकर याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
१३०० किलोमीटरचा प्रवास करून तो रोमानियात पोहचला असून तेथील एका शिबिरात सुरक्षित असल्याने त्याच्या पालकांना दिलासा मिळाला आहे. तुमसर तालुक्यातील खापा येथील विनोद ठवकर हा विद्यार्थी युक्रेनमधील डेनिफर शहरात एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला शिकत आहे. तीन महिन्यापुर्वी तो युक्रेन येथे गेला होता. ६ मार्च रोजी भारतात परतही येणार होता. मात्र रशिया आणि युक्रेन देशात युद्ध सुरू झाले आणि तो अडकला. तेथील थरार अनुभव सांगताना ऐकणाऱ्याच्या अंगावरही काटा उभा राहतो.
विनोद म्हणाला, युद्ध सुरू होतास दुतावासाने महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधून आमची माहिती घेतली. भारतीय दुतावास महाविद्यालय प्रशासनात चर्चा झाली. दोन दिवसापुर्वी युक्रेनच्या डेनिफर शहरापासून रोमानियाच्या सीमेपर्यंत पोहचायचे होते. हे अंतर १३५० किलोमीटरचे आहे. यासाठी महाविद्यालयीन प्रशानाने विद्यार्थ्यांना बसची व्यवस्था करून दिली. युद्धाच्या छायेत आम्ही असे बसे रोमानियाच्या सीमेपर्यंत पोहचलो. सध्या एका राहत शिबिरात आश्रय घेतला असून दोन तीन दिवसात आम्ही देशात परतू, असे त्याने सांगितले.
प्रत्येक ५० किलोमीटरवर झाली तपासणी
डेनिफर येथून निघाल्यानंतर प्रत्येक ५० किलोमीटर अंतरावर बसची तपासणी करण्यात आली. युक्रेनियन सैनिक बस थांबवून प्रत्येक विद्यार्थ्यांची चौकशी करीत होते. भारतीय तिरंगा दाखवा तसेच भारतीय पासपोर्ट दाखविण्याची ते मागणी करीत होते, असे विनोदने सांगितले.
मोबाईल ऑफ करा, फोटो काढू नका
डेनिफर शहरातून बस निघाल्यानंतर युक्रेनियन सैनिकाने पहिल्याच चेकपोस्टवर मोबाईल ऑफ करा, फोटो काढू नका, असे बजावले. प्रवासादरम्यान एकही फोटो काढायचा नाही, असा आदेश प्रत्येक चेक पोस्टवर सैनिक देत होते.