मोहाडी : येथील ग्रामीण रुग्णालयात विविध सुविधांचा अभाव असून, आता तर रुग्णांना गंजलेल्या व्हीलचेअरवर चाचण्यांसाठी नेण्याची वेळ आली आहे. वयस्क नागरिक, चालणे शक्य नाही, अशा रुग्णांना तपासणीवेळी या व्हीलचेअरचा वापर होत असल्याने संसर्गाची भीती निर्माण झाली आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाचे याकडे लक्ष नाही.
मोहाडी येथे ग्रामीण रुग्णालय आहे; परंतु त्याची अवस्था प्राथमिक आरोग्य केंद्रासारखी आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सोडली, तर इतर कोणतीच शस्त्रक्रिया येथे केली जात नाही. अपघात घडल्यावर किंवा पायाला इजा झाल्यावर ज्यांना चालणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी या रुग्णालयात जुनी गंज लागलेली व्हीलचेअर असून, याच खुर्चीने रुग्णाला उपचारासाठी नेले जाते. यातून आजार आणखी गंभीर होण्याची शक्यात आला. हा सर्व प्रकार सुरू असून, कोणीही यावर बाेलायला तयार नाही.
ग्रामीण रुग्णालयात ईसीजी काढण्याचीही सुविधा नाही, एक्स-रे मशीन आहे; पण हाडांचे डॉक्टर नाहीत, इथे पुरुषांचा एक व गर्भवती महिलांचा एक, असे दोन वाॅर्ड आहेत; परंतु या दोन वाॅर्डांसाठी आता एकच परिचारिका कार्यरत असते. पूर्वी दोन परिचारिका असायच्या. तालुक्यातील जवळपास ३० ते ३५ गावांतील रुग्ण या रुग्णालयात मोठ्या आशेने येतात. मात्र, त्यांना त्यांच्या आशानुरूप सेवा मिळत नाही. येथील दुरवस्थेकडे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व जनप्रतिनिधींनी लक्ष घालून उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे गरजेचे झाले आहे.