पवनी : विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या ऐतिहासिक पवनी नगरातील वैजेश्वर घाटावर गत दोन वर्षांपूर्वीपर्यंत ॠषिपंचमीला पंधरा ते वीस हजार महिला पवित्र स्नानासाठी येऊन व्रताची पूर्तता करीत होत्या. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने, जिल्हा प्रशासनाने गर्दी न करण्याचे आवाहन केले. स्थानिक प्रशासनाने यात्रेवर बंदी घातली. परिणामी, वैजेश्वर घाटावर शनिवारी शुकशुकाट पाहायला मिळाला.
शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी दिनदर्शिकेनुसार ॠषिपंचमी होती. ॠषिपंचमीला पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांतून पवनी येथील प्रसिद्ध वैजेश्वर घाटावर पहाटेपासून रजस्वला महिला ॠषिपंचमी व्रत पूर्ण करतात. अशा महिला हजारोंच्या संख्येने हजेरी लावत असत. व्रतस्थ महिला घाटावर पवित्र स्नान करून, बैलांच्या श्रमाशिवाय पिकविलेल्या धान्य (देव तांदूळ) व भाजीपाला यांचे भोजन तयार करतात. पूजापाठ, नैवेद्य करून स्वगावी परतणे असा क्रम असायचा, पण कोरोना संकटामुळे या सर्व व्रतवैकल्यावर विरजण पडले. पवनीपर्यंत पोहोचलेल्या महिलांना प्रवेशद्वारावर थांबवून यात्रा नाही, असे सांगितले जात होते. त्यामुळे त्यांच्या पदरी निराशा पडली.
बॉक्स
वैजेश्वर मंदिरात स्वयंभू शिवलिंग
पवनी येथील प्रसिद्ध वैजेश्वर मंदिर प्राचीन असून, मंदिरातील शिवलिंग स्वयंभू आहे, तसेच गाभाऱ्याबाहेर बारा शिवपिंडी स्थापित करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे वैजेश्वर मंदिराला आगळेवेगळे महत्त्व प्राप्त झालेला आहे. प्रसिद्ध व पावन मंदिर असल्याची श्रद्धा असल्याने हजारोंच्या संख्येने भाविक मंदिरात दर्शनासाठी नित्यनेमाने येत असतात, पण कोरोना संकटामुळे मंदिर बंद आहे. दीड वर्षापासून दर्शनाला मुकले आहेत. ॠषिपंचमी यात्रेवर ही विरजण पडले आहे.