भंडारा : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची जिल्हा, तालुका व शहर पदाधिकारी यांची सहविचार सभा जागेश्वर मेश्राम यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख, जिल्हा कार्यवाह राजेश धुर्वे,चंद्रशेखर रहांगडाले, टेकचंद मारबते प्रामुख्याने उपस्थित होते.
सभेत आगामी २०२२ ला होऊ घातलेल्या नागपूर विभाग शिक्षक आमदार निवडणुकीत संघटनेची पुढील रणनीती तसेच विमाशीचे अधिकृत उमेदवार सुधाकर अडबाले यांना निवडून आणण्यासाठी संघटनेची पुढील दिशा ठरविण्यात आली. तसेच जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्यांबाबत जुनी पेन्शन योजना, डीसीपीएस खात्यातील जमा रक्कम एनपीएस खात्यात वर्ग करणे, वरिष्ठ, निवड श्रेणी, जीपीएफ मेडिकल बिले व थकीत देयके, नियमित वेतनास होणारा विलंब, सातव्या वेतन आयोग दुसरा हफ्ता, डीसीपीएस व जीपीएफ पावत्या, संच मान्यता २०१९ ते २०२१ खाते मान्यता, मंडळ मान्यता व आरटीई मान्यता, थकीत महागाई भत्ता जुलै १९ ते नोव्हेंबर १९-५ टक्के नुसार बाकी असलेले पाच महिने मिळणेबाबत तसेच केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वाढीव ११ टक्के महागाई भत्ता तत्काळ मिळणे इत्यादी प्रलंबित समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मोरेश्वर वझाडे, पुरुषोत्तम लांजेवार, अनिल कापटे, भीष्म टेंभूर्णे, पृथ्वी मेश्राम, श्याम गावळ, सोनवणे, मांढरे, जाधव, शेंडे, डोंगरे आदी उपस्थित होते.