मोहाडी - डोंगरगाव येथे कोरोने थैमान घातले आहे. गावात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. कोरोना संपुष्टात यावा यासाठी गावकऱ्यांनी महायज्ञाचे आयोजन केले. ग्रामदेवतेला कोरोनाच्या महामारीपासून वाचविण्यासाठी साकडे घालण्यात आले आहे.
मोहाडी तालुक्यात तर कोरोचा सामूहिक संसर्ग झाला आहे. त्यामुळे नऊ लोकांचे जीव गेले आहे. अनेक घरी कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. गावातील प्रत्येक लोक भेदरलेल्या अवस्थेत आहेत. कोरोनाचा प्रकोप नाहीसा व्हावा. संसर्ग झालेली व्यक्ती बरी व्हावी. संपूर्ण गाव या प्रकोपातून लवकर निघावा. गावात सामान्य व पूर्वस्थिती निर्माण व्हावी याकरिता संपूर्ण गावातील लोकांनी गावदेवीच्या मंदिरात सामूहिक आरती केली. मातेच्या मंदिरात अभिषेक करण्यात आले. हळदी कुंकवाचे कार्यक्रम करण्यात आले. यावेळी सामूहिक हवन कार्यही करण्यात आले. ग्रामदेवतेला कोरोनाच्या महामारीपासून वाचविण्यासाठी साकडे घालण्यात आले आहे. या दोन दिवशीय कार्यक्रमामध्ये १३ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता गावातील कमलदास बाबा मठ, हनुमान मंदिर, नाग मंदिर, दुर्गा माता मंदिर, जराही-मराही माता मंदिर, माँ काशी मंदिर, गाव शेजारच्या टेकडीवरील महाकालेश्वर मंदिर या सर्व मंदिरांमध्ये पूजा अर्चना करण्यात आली. गावाच्या सीमेवर सुद्धा पूजा करण्यात आली. गावातील युवा वर्गाकडून बाईक रॅली काढण्यात आली होती. महिलांनी दुर्गा माता मंदिर ते माता माई मंदिरपर्यंत कलश यात्रा काढली होती. माता माई मंदिरामध्ये सत्यनारायण पूजा, नऊ ग्रहांची पूजा व नवदुर्गाच्या घटाची ज्योत पेटवण्यात आली होती. गावकऱ्यांनी महाआरती ही केली. रात्रीला भजनाचा कार्यक्रम करून देवीचे जागरण करण्यात आले होते.
१४ एप्रिल रोजी सकाळी साडेपाच वाजता सामूहिक आरती व नऊ वाजता माता माईच्या मंदिरात मातेचे अभिषेक केले गेले. हळदी कुंकवाचे कार्यक्रम करण्यात आले. त्यानंतर सामूहिक हवन कार्य करण्यात आले. कोरोनाच्या महामारीपासून वाचविण्यासाठी ग्रामदेवतेला संपूर्ण गावातील लोकांनी सामूहिक साकडे घातले होते. हे सर्व कार्यक्रम सरकारच्या सर्व नियमांचा पालन करीत व मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करीत पार पाडले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन डोंगरगाव ग्रामवासीयांना करण्यात आला होता.