गुन्हा दाखल : बुरखा घालून घरात प्रवेशसाकोली : रात्रीचे जेवन करून घरात सर्वजण झोपून असताना अज्ञात बुरखाधारी चोरट्यांनी घरात प्रवेश करून सव्वा दोन लाख रूपयांचे सोनेचांदीचे दागिने लंपास केले. ही घटना शनिवारच्या मध्यरात्री साकोली येथील दुर्गा चौकातील रहिवाशी जोशी यांच्या घरी घडली.रेखा लक्ष्मण जोशी या मुलगा व सुनेसोबत राहतात. नित्याप्रमाणे जोशी कुटुंब रात्री जेवन करून झोपले होते. दरम्यान मध्यरात्री २ ते २.३० वाजताच्या सुमारास तीन बुरखाधारी चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी रेखा जोशी यांना कुणीतरी घरात आल्याची चाहुल लागल्यामुळे त्या जाग्या होऊन खोलीतून बाहेर पडले. त्यावेळी चोरट्यांनी तिला धाकदपट करून दुसऱ्या खोलीत डांबून ठेवले. त्यानंतर चोरट्यांनी कपाटातील सोनेचांदीच्या २ लाख १७ हजार ५०० रूपयांचा ऐवज लंपास करून पळून गेले. त्यावेळी मुलगा व सून हे दुसऱ्या खोलीत झोपून होते. त्यांना ३ वाजताच्या सुमारास घटना कळली. त्यानंतर मुलाने साकोली पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले. श्वानांनी शोध घेतला मात्र चोरट्यांचा शोध लागला नाही. दुसरी घटना महालगाव येथील मंदिरात अज्ञात चोरट्यांनी तांदुळ, गहू, डाळ व ध्वनीक्षेपक असा दहा हजार रूपयांचे साहित्य चोरून नेले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड हे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
साकोलीत २.२५ लाख रूपयांचे दागिने चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2017 12:21 AM