दररोज १२५ सिलेंडर निर्मितीची क्षमता
पवनी : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा पडल्याने राज्य शासनाने पुढील काळात ऑक्सिजनची टंचाई भासू नये म्हणून राज्यभर हवेतून ऑक्सिजन शोधून तो रुग्णांना देणाऱ्या प्रणालीद्वारे ऑक्सिजन प्लांट निर्मितीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. पवनी तालुक्यातही सिंदपुरी कोविड उपचार केंद्रावर ऑक्सिजन प्लांट साकारत आहे. या प्लांटची दररोज ऑक्सिजन निर्मिती क्षमता १२५ जम्बो सिलिंडर एवढी राहणार आहे.
कोरोनाची पहिली लाट संपल्यानंतर जनतेनी उसंत घेतली असताना अचानक आलेल्या दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक घातक असल्याने सरळ शरीरातील प्राणवायूवर मारा करणारी ठरली. दरम्यान अनेक रुग्णांच्या ऑक्सिजनची टक्केवारी कमी झाल्याने रुग्ण दगावण्याचे प्रमाण पाहायला मिळत आहेत. याचा फटका भंडारा जिल्ह्याला ही बसल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील सर्व तालुक्यात ऑक्सिजन प्लांट निर्मितीकडे विशेष लक्ष दिले आहे. पुढील काळात येणाऱ्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनची कमतरता पडू नये म्हणून पवनी तालुक्यातील सिंदपुरी येथील कोविड सेंटरवर ही ऑक्सिजन प्लांटची निर्मिती चालविण्यात आली असल्याची माहिती आहे.
सिंदपुरी कोविड सेंटर सर्वसोयींनी संपन्न असून जिल्ह्यात रोल मॉडेल ठरले आहे. १०० बेडचे असलेले सदर उपचार केंद्र शेकडो रुग्णांना दिलासा देऊन गेले. २५० च्या वर रुग्ण येथून बरे होऊन घरी परतले आहेत. पुढील काळात कोरोनाची तिसरी लाट येणार असून जनतेसाठी घातक ठरणार असल्याचे आरोग्य यंत्रणेने जाहीर केले आहे. दरम्यान रुग्णांची वाताहत होऊ नये किंबहुना कोरोना युद्ध जिंकता यावे यासाठी खबरदारी म्हणून शासनाने दुसऱ्या लाटेत आलेल्या अडचणीचा निपटारा करण्याचा हेतू नियोजन करण्याचे चालविले आहे.
ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन व इतर औषधांचा तुटवडा भरून काढण्याच्या दिशेने कार्य आरंभले आहे. याचाच परिपाक म्हणून तिसऱ्या लाटेची दाहकता लक्षात घेऊन रुग्णांना ऑक्सिजन भरपूर मिळावे याकरिता जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांटची निर्मिती केल्या जात आहे. सिंदपुरी कोविड उपचार सेंटरची आरोग्य व्यवस्था प्रबळ व्हावी म्हणून काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी जिल्हा प्रशासनाकडे तगादा लावला असताना जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी प्रशासकीय स्तरावरून आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या.
सेंटरला भेट देऊन सोयी-सुविधांचा वारंवार आढावा घेण्याचे काम केले. यातून लक्षात येणाऱ्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न चालविले. परिणामी सिंदपुरी कोविड उपचार केंद्रांमध्ये ऑक्सिजन प्लांटची निर्मिती होत असल्याने रुग्णांना संजीवनी मिळणार असल्याच्या चर्चा जनतेत जोर धरू लागल्या आहेत. सदर प्लांटमुळे ऑक्सिजनची निर्मिती होऊन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर प्रस्तुत प्रकल्पात निर्माण होणारा ऑक्सिजन रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. कोरोना बाधित असताना अंधारलेल्या आयुष्यात प्रकाश दाखविण्याचे कार्य ऑक्सिजन प्लांटमुळे होणार आहे. येथे आरोग्य व्यवस्थेसाठी डॉ. गुरूचरण नंदागवळी यांच्या नेतृत्वात डॉ. चित्रा वाघ, डॉ. धनराज गभने, शाहिद अली, प्रदीप घाडगे व इतर कर्मचारी युद्ध स्तरावर काम करीत आहेत.