साकोली : शहरात नऊ दिवसांपूर्वी गणेशोत्सवाला प्रारंभ झाला व उद्या विसर्जन आहे, तर पाच दिवसीय गणेशाचे विसर्जन करण्यात आले आहे. गतवर्षी येथील होमगार्ड परेड ग्राउंडवर कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली होती.मात्र या वर्षी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले नाही. त्यामुळे या वर्षी पुन्हा तलावात विसर्जन करण्याची वेळ भाविकांवर आलेली आहे.
कोरोनामुळे गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा होत आहे. साकोली तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात असली तरी जिल्हाधिकाऱ्यांनी बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवर प्रतिबंध घातला आहे. त्यामुळे सार्वजनिक आणि घरगुती गणपतीची सजावट अगदी साधेपणाने करावी, गणपतीचे घरीच विसर्जन करावे व ते शक्य नसल्यास नगर परिषदेतर्फे उभारण्यात आलेल्या जवळच्या कृत्रिम विसर्जन कुंडात गणपतीचे विसर्जन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. मात्र साकोली येथे या वर्षी कृत्रिम तलाव तयार करण्यात आला नाही.
बॉक्स
मडावी मॅडमची झाली आठवण
आपल्या कर्तव्यदक्ष कामाने ओळख ठेवणाऱ्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांची यानिमित्ताने पुन्हा आठवण झाली. त्यांनी गतवर्षी होमगार्ड परेड ग्राउंड साकोली येथे कृत्रिम तलावाची निर्मिती करून घरगुती व सार्वजनिक गणेशांचे विसर्जन करण्याचे आवाहन केले होते व ते यशस्वीपणे पूर्ण पार पडले. तत्कालीन मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी मागील वर्षी कृत्रिम तलाव निर्मिती केली होती. त्या कृत्रिम तलावाचे काही साहित्य आजही नगर परिषदेमध्ये आहे. त्यामुळे कमी खर्चात या वर्षीही कृत्रिम तलाव तयार होऊ शकत होता.
कोट
कृत्रिम तलाव निर्मितीसाठी नगर परिषदेत निधी नाही, त्यामुळे या वर्षी कृत्रिम तलावनिर्मिती केली नाही, पण त्याला बॅरिकेड्स लाइटची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांनी गणेश बाप्पाचे विसर्जन तलावातच करावे.
- धनवंता राऊत, नगराध्यक्ष, साकोली