महिलेची प्रकृती चिंताजनक : चिमुकलीवर अंत्यसंस्कार साकोली : येथील एकता कॉलोनीमधील रहिवासी संगीता अनिकेत हटवार (२४) या महिलेने पाच महिन्याची चिमुकली जिज्ञाशा हिला घेऊन खैरलांजी येथील तलावात आत्महत्या करण्यासाठी उडी घेतली होती. यात चिमुकलीचा मृत्यू झाला. या महिलेने मुलीसह आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला याचा शोध पोलिसांना अजूनही लागला नाही. ती महिला भंडारा येथे एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. तर आज त्या चिमुकलीवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.संगीता साकोली येथे पती, सासु, सासरे व मुलगी जिज्ञाषा हिच्यासोबत राहत होती. संगीताचे पती साकोली आगार येथे वाहक असल्याचे काल सकाळी ते नोकरीवर निघून गेले. त्यानंतर संगीता, सासु, सासरे व मुलीसोबतच घरी होती. या दरम्यान असे काय घडले की संगीताने पोटच्या मुलीला घेवून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. आधी संगीता मुलीला घेवून नवतलाव साकोली येथे आत्महत्या करण्याकरीता गेली होती. मात्र लोकांनी तिला समजावून घरी परत जाण्यास सांगितल्याची परिसरात चर्चा आहे. मात्र संगीता मुलीसोबत घरी परत न जाता लागूनच असलेल्या खैरलांजी येथील तलावात गेली व मुलीसह आत्महत्या करण्याच्या उद्देशाने उडी घेतली. या घटनाक्रमाला जवळपास अर्धा ते पाऊनतास लागला असावा. मात्र त्यावेळी घरी असलेल्या सासु सासऱ्यांनी सुनेचा व नातनीची शोधाशोध का केली नाही, हाही प्रश्नच आहे. परिसरात आत्महत्याची चर्चा जोर धरू लागली आहे. संगीताची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर भंडारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेला २४ तासापेक्षा जास्त कालावधी लोटला. मात्र पोलिसांना आत्महत्येचे खरे कारण कळू शकले नाही. मात्र आत्महत्येचे प्रकरणी कौटुंबिक वादातून घडली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. यासह अनेक तर्कवितर्क मानले जात आहे. पुढील तपास साकोली पोलीस करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)
साकोली येथील आत्महत्येचे रहस्य कायम
By admin | Published: August 01, 2015 12:13 AM