नगरपरिषदेत सेंदुरवाफा गावाचा समावेश : निवडणुकीपर्यंत तहसीलदार प्रशासक संजय साठवणे ल्ल साकोली कित्येक वर्षापासून साकोली ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेत व्हावे, यासाठी साकोलीवासी प्रतिक्षेत होते. अखेर आज महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी साकोली नगरपरिषदेची घोषणा करून साकोलीवासीयांना आनंदाची वार्ता दिली. या नगरपरिषदेसाठी आ. बाळा काशीवार व याचीकाकर्ता तथा माजी सभापती मदन रामटेके यांनी प्रयत्न केले. एक वर्षाआधी साकोली ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये झाले होते. त्यानुसार नगरपंचयतीचे निवडणुकाही लागल्या होत्या ; मात्र वाढती लोकसंख्येचा विचार करून व भविष्यात पुन्हा नगरपरिषदेसाठी मागणी करण्याच्या उदात्त हेतूने मदन रामटेके यांनी न्यायालयात धाव घेतली होती. साकोली नगरपंचायतीऐवजी सेंदुरवाफा व साकोली ही दोन्ही गावे मिळून नगरपरिषदेसाठी याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने साकोली नगरपंचायतीच्या निवडणुकीवर स्थगिती दिली होती. यानंतर साकोलीचे आमदार बाळा काशीवार यांनी मंत्रालयात सातत्याने पाठपुरावा करीत साकोली नगरपरिषदेसाठी सहकार्य केले. आज महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी साकोली नगरपरिषदेची सुचना जाहीर करीत नगरपरिषदेची घोषणा केली. साकोलीच्या नावानेच नगरपरिषद महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी सेंदुरवाफा व साकोली या दोन्ही गावे मिळून साकोली नगरपरिषदेची घोषणा केली. दोन्ही गावे मिळून साकोली नगरपरिषद राहणार आहे, असे आदेशात नमूद आहे. दोन्ही ठिकाणी तहसीलदार प्रशासक नव्याने घोषित केलेल्या साकोली नगरपरिषदेची रचना पुर्णपणे होईपर्यंत साकोली व सेंदुरवाफा या ठिकाणी प्रशासक म्हणून तहसिलदार हे प्रशासक राहणार आहेत. सेंदुरवाफा पंचायत समिती क्षेत्र बाद साकोली नगरपरिषदेत सेंदुरवाफा या गावाचे विलीनीकरण करण्यात आल्यामुळे यापुढे सेंदुरवाफा पंचायत समिती क्षेत्र बाद करण्यात आले आहे. त्यामुळे सेंदुरवाफाच्या पं.स. सदस्या धनवंता राऊत यांचे सभासदत्व आजपासून संपुष्ठात आले आहे. ग्रामपंचायत सेंदुरवाफा बरखास्त राज्यपालांनी साकोली नगरपरिषदेची घोषणा करून सेंदुरवाफा ग्रामपंचायत बरखास्त केली असून आता या ग्रामपंचायतीवर प्रशासक तहसलिदार साकोली हे राहतील, असे आदेशात नमुद आहे.
साकोली नगरपरिषदेची घोषणा
By admin | Published: July 15, 2016 12:41 AM