व्यवस्था बिघडली : नागरिकांची वणवण थांबता थांबेनासाकोली : तालुक्यातील प्रशासकीय व्यवस्थेवर लोकप्रतिनिधींचे किती लक्ष आहे याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे तालुक्यात चाललेला प्रभारी कारभार. तालुक्यातील अनेक अधिकारी प्रभारी असल्याने जनतेची कामे खोळंबली आहेत.जिल्ह्यातील साकोली प्रशासकीय यंत्रणेतील एक उपविभाग आहे. या विभागात महत्त्वाचे प्रशासकीय अधिकारी हे प्रभारी आहेत. साकोली उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक अनेक वषार्पासून प्रभारी आहेत. यासोबत येथे डॉक्टरांचीही टंचाई आहे. माणसांच्या जीवाचे आरोग्य सांभाळणारी यंत्रणाच आजारी आहे. काही दिवसांपूर्वीच साकोली पंचायत समितीचे प्रभारी खंडविकास अधिकारी सेवानवृत्त झाल्याने ते पद पुन्हा प्रभारीवर आहे. गटशिक्षणाधिकारी यांचे स्थानांतर झाल्याने तेही पद प्रभारी आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी, तालुका विकास प्रकल्प अधिकारी, तालुका अन्न पुरवठा निरीक्षक, पिंडेकेपारचे केंद्रप्रमुख यांच्यासह अनेक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, पशुवैद्यकीय अधिकारी प्रभारीच आहेत. तहसीलदार हंसा मोहने यांचे नागपूरला स्थानांतरण झाले. त्यानंतर त्यांचे जागी नवीन तहसीलदार शातांराम मोटघरे रूजू झाले. ते सुध्दा ७ महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत. म्हणजे तहसीलदारांचे पदही काही महिन्यांनी रिक्त होऊन प्रभारी होईल, असे म्हणायला हरकत नाही. भाजपासह, कॉग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचे मुंबईत-दिल्लीत मोठे वजन ठेवणाऱ्या नेत्यांचे मुख्यालय असलेल्या साकोलीला प्रभारी हा नवीन आजार लागला आहे.कोण, कुठे अधिकारी आहेत किंवा नाही, याचेशी जनतेला घेणेदेणे नाही. परंतु,जनतेची कामे वेळेवर व्हावीत हा महत्वाचा भाग आहे. प्रभारी अधिकाऱ्यांचा कारभार म्हणजे त्यांच्या प्रभारावर नियमित अधिकारी आले की, परत आपल्या पूर्वीच्या जागेवर जावे लागते. आज नाही उद्या हे प्रभार सांभाळणारे अधिकारी नियोजित जागेवर परत जाणर असल्याने प्रभारी व्यवस्थापनात या प्रभारी अधिकाऱ्यांचा प्रभाव कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर किती पडतो? हे न उलगडणारे कोडे आहे.शासन अधिकारी, कर्मचाऱ्यांची बदली करते. कुणी सेवानिवृत्त होतात. परंतु, त्यांचे रिक्तपदे त्वरित भरण्यासाठी बराच कालावधी लागतो. अशा आजारी यंत्रणेवर औषधोपचार लवकर व्हावा म्हणुन लोकशाहीमध्ये गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत लोक प्रतिनिधी निवडण्याची पद्धत आहे. निवडून आलेले लोकप्रतिनिधी जनता आणि शासन यांना जोडणारा महत्वाचा भाग आहे. परंतु, निवडणुकीत विकासाचे तुणतुणे वाजविणारे लोकप्रतिनिधींचा आपला क्षेत्रातील प्रशासनावर किती लक्ष आहे हे साकोलीच्या प्रभारी कारभारावरून लक्षात येते. गावागावातील विविध कार्यालयाची आकडेवारी घेतली तर प्रभारींची मोठी यादीच तयार होईल. शासनाने नोकरभरती बंद करून लाखो बेरोजगारांची फौज उभी केली. त्या कर्मचारी अधिकाऱ्यांना भरमसाठ पगार वाढ करण्याची युक्ती सुरू केली. पगारवाढ करण्यापेक्षा नोकरभरती करा आणि राज्यातील प्रभारी रोग नाहीसा करा असे काही तज्ज्ञांचे मत आहे. प्रभारींचा डाग केव्हा मिटणार? याची चर्चा आता तालुक्यात सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)
प्रभारींच्या खांद्यावर साकोली तालुक्याची धुरा
By admin | Published: September 14, 2015 12:27 AM