: पावसात घर पडून बेघर झालेल्या व्यक्तिला गावकऱ्यांनी तात्पुरता आश्रय दिला. गावातील शासकीय गोदाम राहायल दिले. गत सात वर्षांपासून तेथे राहात आहे. मात्र, अलीकडे त्याने थेट अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरू केला. गोदाम सोडण्यासाठी वारंवार सांगण्यात आले. मात्र, तो आता कुणाचे ऐकायला तयार नाही. लाखनी तालुक्यातील इसापूर येथील या प्रकाराने गावकरी त्रस्त झाले आहेत.
इसापूर येथे सात वर्षांपूर्वी मोतीराम बनसोड यांचे पावसात घर पडले. त्यावेळी गावकऱ्यांनी त्याला सेवा सहकारी संस्थेच्या मालकीचे गोदाम राहायला दिले. दोन -तीन वर्ष तिथे विनातक्रार निवास केला. परंतु नंतर गोदामातच अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरू केला. यामुळे गावात शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. शेतकऱ्याच्या धान खरेदीचा प्रश्न उभा ठाकला. गावातील शेतकऱ्यांना आधारभूत केंद्रावर धान विकण्याकरिता इतर गोदामाचा आधार घ्यावा लागतो. गोदाम मोकळे झाल्यास शेतकऱ्यांना गावातच आधारभूत केंद्राचा लाभ होईल. सुमारे सहा ते सात हजार कट्टे धान त्या गोदामात साठवणूक होऊ शकतो. परंतु तो आता गोदाम खाली करायला तयार नाही. सदर व्यक्तिला घरकुल योजनेअंतर्गत घरकुलसुद्धा मंजूर झालेले आहे. गोदाम मोकळे करण्याची मागणी सरपंच शालू गिदमारे, पोलीसपाटील नीलकंठ लांडगे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विनोद बाभरे यांनी केली आहे.