भंडारा : शहरातील अत्यंत गजबजलेल्या मोठा बाजार परिसरात भर दिवसा खुलेआमपणे बाजार चौकात दारू विक्रीला उधाण आले आहे. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशितही केले. मात्र यावर दारू विक्रेते व पोलीस प्रशासनाच्या नवीन शक्कलपुढे दारू विक्री करणाऱ्यांना अभय मिळत आहे. धाड मारायला पोलिसांचे वाहन सायरन येते. सध्या दारू विकणारे व पिणारे दोन्ही सतर्क होत असल्याने कारवाई नावापुरतीच असल्याचे बोलले जात आहे.
भंडारा शहरात अवैध धंदे ही काही नवीन बाब नाही मात्र यावर पोलीस प्रशासन अंकुश किंवा आळा घालायला गंभीर दिसून येत नाही. भंडारा शहरातील अत्यंत गजबजलेल्या मोठा बाजारसह काही ठिकाणी दारूविक्रीसह अवैध धंदे जोमात सुरू आहे.
मोठा बाजार परिसरातील बाजार चौक, सेंट्रल बँकेसमोर व गल्लीबोळात देशी दारूची विक्री केली जाते. यात काही इसम मद्य घेऊनच या ठिकाणी येतात. टेबलावरच दारूचे ग्लास भरून दारू ढोसली जाते. याची कल्पना सूज्ञ नागरिकांना आल्यावर याबाबत पोलिसांना सांगितले आहे. यासंदर्भात पोलिसांनी थातूरमातूर कारवाई केली. तसेच दारू विक्री करणाऱ्या व पिणाऱ्यांनाही अभय देण्याच्या दृष्टिकोनातून नवीन शक्कल लढविली असे दिसून येत आहे.
बाजारात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. आता पुन्हा दारूविक्री सुरू झाली आहे. दारू विक्रेते व पिणारे दोन्ही तिथून पळ काढतात. महिला व तरुणींसाठी हा परिसर आता धोकादायक ठरत आहे. सायंकाळच्या नंतर तिथून जाणे जिकिरीचे झाले आहे. भंडारा शहरातील हजारो लोक बुधवार व रविवारला आठवडी बाजार निमित्त तिथे येत असतात.