मोहन भोयर
तुमसर (भंडारा) : शहराची श्रीमंत नगरी म्हणून ओळख असून अनेक श्रीमंतांनी भाडेतत्त्वावर शासनाकडून भूखंड घेतले. त्यावर व्यावसायिक इमारतींचे बांधकाम केले. या भूखंड व इमारतींची कोट्यवधी रुपयांत परस्पर विक्री केली. नियमानुसार विक्री करता येत नसल्याने भूखंड व इमारतधारकांनी स्टॅम्प पेपरवर खरेदी-विक्रीचा व्यवहार केल्याची धक्कादायक माहिती आहे.
तुमसर शहरात शासनाकडून भाडेतत्त्वावर मोठ्या प्रमाणात भूखंड घेण्यात आले होते. सेवाभावी संस्थांच्या नावे लोकोपयोगी कार्य करण्यासाठी शासनाकडून नाममात्र शुल्कात भूखंड घेतले होते. धर्मादाय आयुक्त कार्यालयात संस्थेची नाव नोंदणी करण्यात आली होती. सुरुवातीला काही वर्षे त्यांनी लोकोपयोगी कार्य या इमारतीत केले. नंतर इमारती भाड्याने देण्यात आल्या. भाड्यापोटी लाखो रुपये इमारत मालकांनी घेतले. त्यानंतर इमारती विक्री करण्याचा गोरखधंदा त्यांच्याकडून सुरू झाला. आता शहरातील मोक्याची ठिकाणे बिल्डरांच्या घशात जात आहेत.
बिल्डरांची लॉबी सक्रिय झाली
शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या इमारती या जुन्या झालेल्याचे दर्शवून तसेच इमारतींचे आयुष्य संपले अशी नोंद नगरपरिषदेकडे करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने इमारती भुईसपाट करून भूखंडांचा उपयोग आता व्यावसायिक गाळे करण्यासाठी करणे सुरू झाले आहे. भाडेतत्त्वावर मिळालेल्या भूखंडाची विक्री परस्पर करता येत नाही. त्यामुळे विक्री करणारे व खरेदी करणारे यांच्यात आपसी समझोता केला जातो. स्टॅम्पपेपरवर विक्री खरेदी प्रकरण सोपस्कर पार पाडण्यात येतात. महत्त्वपूर्ण मोक्याच्या जागेवर असलेल्या इमारती व भूखंड कमी किमतीत मिळत असल्याने येथे बिल्डरांची लॉबी सक्रिय झाली आहे.
'त्या' प्रकरणाची चौकशी होणार काय?
तुमसर शहरात जुन्या मोठ्या इमारतींची विक्री करण्यात आली. या इमारतींचे भाडेतत्त्वावर घेतलेल्या भूखंडावर बांधकाम केले होते. जुन्या इमारती पाडून तिथे नवीन इमारतींचे बांधकाम करण्यात आले. या प्रकरणात मोठे अर्थकारण झाले आहे. त्याची चौकशी जिल्हाधिकारी करणार काय असा प्रश्न आहे.
लिजचे नूतनीकरण करण्याचे आवाहन
शासनाकडून वाटप करण्यात आलेल्या भाडेपट्ट्यासंबंधी पडताळणी करून नूतनीकरण करण्याची विशेष मोहीम तुमसर शहरात राबविण्यात येत आहे. शहरात २३३ भाडेपट्टे शासनाकडून वाटप करण्यात आले होते. यात भाडेपट्टेधारकांनी विनापरवानगी वापरात बदल हस्तांतरण करून केलेला आहे किंवा कसे याबाबत शोध घेण्यासाठी तलाठ्यांचे पथक तयार करण्यात आले आहे. या लिजचे नूतनीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.