भंडारा : शहरालगत असलेल्या केसलवाडा येथे १९९३-९४ मध्ये ले-आऊ टधारकांनी प्लॉट पाडले. प्लॉटधारकांसाठी येथे खुली जागा सोडण्यात आली होती. या खुल्या जागेवर परस्पर प्लॉट पाडून त्यांची विक्री करुन शासनाची दिशाभूल करण्यात आली आहे. यासोबतच लगतचा स्मशानभूमीवर अतिक्रमण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायत भोजापूरची गट ग्रामपंचायत असलेली केसलवाडा आता स्वतंत्र ग्रामपंचायत झाली आहे. या केसलवाडा येथे १९९३-९४ मध्ये पटवारी हलका नं.१२ सर्वे नं. ४३ मध्ये एका ले-आऊ टधारकांने निवासी प्रयोजनासाठी शासनाकडून मंजूरी घेवून येथे प्लॉट पाडले. या ले-आऊ ट साठी तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांनी १४,०११.६४१ स्के.मीटरमध्ये प्लॉट पाडण्याचे आदेश २८ जानेवारी १९९४ मध्ये पारित केले होते. मात्र या आदेशाची अंमलबजावणी न करता ले-आऊ ट मालकाने शासनाचे धाब्यावर बसवून १७,९४७.२९६ स्के. मीटरमध्ये प्लॉट पाडून विकले. यासोबतच १२,२०० स्के. फुटची ओपन स्पेसची जागा ही सोडण्यात आली. या खुल्या जागेवर प्लॉट मालकाने कालांतराने आठ प्लॉट पाडून त्याची विक्री केली. या विक्रीसाठी सदर ले-आऊ ट मालकाने नगररचनाकार, दुय्यम निबंधक अधिकारी, ग्रामसेवक, पटवारी, तहसील कार्यालयातील अधिकारी यांना हाताशी धरुन खुल्या जागेतील प्लॉटची विक्री करण्यात आली. यासोबतच सदर ले-आऊ टधारकाने ओपन स्पेस लगत असलेल्या स्मशानभूमीला ले-आऊ टची खुली जागा दाखवून प्लॉट खरेदीदारांची फसवणूक करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या खरेदीदारांपैकी चार व्यक्तींनी येथे स्वत:ची घरे बांधली असून तेथे निवास सुरु केला आहे. अनधिकृतरित्या प्लॉट काढून त्यांची विक्री करतांना प्लॉटधारकांने पटवारी यांना हाताशी धरुन सातबाराही तयार करण्यात आलेला आहे. या प्रकरणी ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाई करण्याऐवजी येथील प्लॉट खरेदीधारकांनी घरे बांधण्यासाठी मागितलेली परवानगी शहानिशा न करता परवानगी दिल्याचाही गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ग्रामपंचायतीच्या तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच व पदाधिकारी यांना अनेकदा निवेदन प्रकारणाचे गांभीर्य सांगितले. मात्र त्यांनीही दुर्लक्ष केल्याचे लक्षात येते. स्मशानभूमी, नाला व ले-आऊ टची मोजणी करवी. यासोबतच यात गुंतलेल्या सर्वांवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी केसलवाडा ग्रामपंचायतचे उपसरपंच मनिषा वैद्य, ग्रामपंचायत सदस्य मंगेश सार्वे, महेंद्र रामटेके, बी. टी. उराडे, प्रीती शहारे, दिपा लांजेवार, मंदा रंभाड, रुपाली थोटे, शोभा बागडे, लिला पांडे, के.एम. वैद्य, एन.एच. धांडे, किशोर शाहू, कपूरचंद जांगडे, देविदास लोहकर, अनिल सालवे आदी केली आहे.(शहर प्रतिनिधी )ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा पुढाकारभोजापूर व केसलवाडा ही गट ग्रामपंचायत असतांना ले-आऊ टची विक्री झाली. तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक यांचा यात हस्तक्षेप असल्याचा आरोप होत आहे. आता केसलवाडा ही स्वतंत्र ग्रामपंचायत झाली असल्याने विद्यमान ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
ले-आऊ टमधील खुल्या जागेची विक्री
By admin | Published: October 03, 2016 12:30 AM