शेतकऱ्यांना पशुपालन केल्याशिवाय गत्यंतर नाही. जोडधंदा या नात्याने पालांदूर परिसरासह अख्ख्या जिल्ह्यात मोठ्या संख्येत पशुपालन केले जाते. पालांदूर परिसरात ग्रामीण भागात पशुपालन मोठ्या प्रमाणात आहे. शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना नेहमी शेतकऱ्यांच्या सेवेत असल्याने पशुपालन तत्परतेने व्यापक स्वरूपात मोठे झाले आहे. दररोज हजारो लिटर दूध संकलित केले जाते. मांस विक्रीकरिता बकरी बाजार सुद्धा पालांदूर येथील सुपरिचित आहे. मात्र, आता लाळ्या खुरकुत रोगाची दहशत परिसरात पशुपालकांनी घेतली आहे.
घटसर्प, डांग्या रोगांची लसीकरण झालेले असून लाळ्या खुरकुत रोगाची सुद्धा प्रतिबंधात्मक लसीकरण अत्यंत महत्त्वाची आहे. शासन, प्रशासन स्तरावरून तत्परतेने लसीकरणाचे प्रयत्न अत्यावश्यक आहेत. पालांदूर पशुवैद्यकीय दवाखाना अंतर्गत वीस गावांचा कार्यभार सांभाळला जातो. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पालांदूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात अगदी सकाळपासूनच पशुपालकांची आपल्या पशूंसह आजाराविषयी माहिती, उपचाराकरिता हजेरी असते. लसीकरण अत्यंत महत्त्वाचे असून शासकीय नियोजनाचे अनुषंगाने तत्परता अत्यंत आवश्यक आहे.
चौकट
लाळ्या खुरकुत हा रोग संसर्गजन्य आहे. या रोगामध्ये मृत्यूचे प्रमाण अत्यल्प असते. मात्र, जनावरांच्या दुधामध्ये सुमार घट होते. चारा पाणी कमी खाणे, ताप राहणे व तोंडाद्वारे लाळ येणे, जिभेवर व पायावर जखम होणे, जनावरांना कमजोरी येणे आधी लक्षणे लाळ्या खुरकुत रोगाची आहेत. बाधित जनावराला विलगीकरणत ठेवून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार त्याच्यावर उपचार करावेत. यात घाबरण्यासारखे नसले तरी वेळेत काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
कोट
गावागावात जाऊन पशुपालकांची भेट घेत मार्गदर्शन सुरू आहे. शासन स्तरावरून लस उपलब्ध झालेली नाही. वरिष्ठ स्तरावरून लसीकरणाची सूचना येताच लसीकरण केले जाईल.
डॉ. देवयानी नगराळे, पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना, पालांदूर.
कोट
केंद्र सरकारकडून राज्य शासनाला लाळ्या खुरकुत रोगाची लस उपलब्ध होते. ती अजूनपर्यंत आलेले नाही. आमची मागणी नोंदविलेली आहे. लस उपलब्ध होताच लसीकरण केले जाईल.
नरेश कापगते, जिल्हा पशुधन विकास अधिकारी, भंडारा