लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : यावर्षीही दुष्काळाने शेतकऱ्यांची पाठ सोडली नाही. पाण्याअभावी शेतकऱ्यांनी मड्डा कापला. महसूल आणि कृषी विभागाने प्रत्यक्ष शेतात जावून करपले धान पीक बघितले. तरीही मोहाडी तालुका दुष्काळाच्या यादीतून वगळला. त्यावर आता नजर आणेवारी ६२ पैसे दाखवून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले.शेतकऱ्यांच्या नशीबी आलेल्या दुष्काळाने बळीराजाचा कणाचा मोडून टाकला आहे. दुसऱ्याही वर्षी दुष्काळाचे दृष्टचक्र शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे. पावसाने दिलेला दगा, अपूर्ण पर्जन्यमान, किडींचा प्रादूर्भाव या कारणामुळे भात पिकाला मोठा फटका बसला. त्यानंतर काही प्रमाणात हातात भातपीक येईल. ही शाश्वता असताना पेंच प्रकल्पाचे पाणी खूप उशिरा मिळाले. त्यामुळे शेवटच्या टोकावरील असणारे धानाचे पीक गर्भावस्थेत मारले गेले. सिंचनासाठी शेतकऱ्यांना मोठा संघर्ष करावा लागला. दुष्काळसदृष्य परिस्थिती असताना शेतावर जावून भातपिकांची पाहणी केली. त्यानंतर मोहाडी तालुका दुष्काळसदृष्य यादीतून गहाळ करण्यात आला आणि कृषी विभाग, महसूल विभागाने मोहाडी तालुक्याची गावनिहाय नजरअंदाज आधारित ६२ पैसे तर ग्रामपंचायत निहाय सुधारित पैसेवारी ६५ पैसे काढली. या आणेवारीच्या आकड्याने शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली आहे. मोहाडी तहसीलदारांनी मंडळ निहाय पैसेवारी जाहीर केली. त्यात काही मंडळाची ग्रामपंचायतनिहाय नजरअंदाज पैसेवारी ६१ पैसे, आंधळगाव मंडळाची ६४ पैसे, मोहाडी मंडळाची ६४ पैसे, कान्हळगाव मंडळाची ६१ पैसे, वरठी मंडळाची ५६ पैसे तर करडी मंडळाची ६३ पैसे अशी आणेवारी दाखविण्यात आली आहे.गाव निहाय सुधारित पैसेवारीत फारसा फरक दिसून आलेला नाही. मोहाडी तालुक्यात २८ हजार ६७३ हेक्टर आर क्षेत्र भात पिकाखाली येते. त्यापैकी ४ हजार ८३४ हेक्टर आर क्षेत्र कोरडवाहू आहे. म्हणजे २३ हजार ८३९ हेक्टर आर क्षेत्र ओलीत क्षेत्रात मोडत असताना ही सलग दुसºया वर्षी पाण्याअभावी धानपिकाला मोठा फटका बसलेला आहे. मोहाडी तालुका दुष्काळाने व्यापला असतानाही शासन मोठ्या चलाखीने बळीराजांशी दुष्काळ सुकाळ असा खेळ करीत आहे. सध्या रँडम पद्धतीने भातपिकांचे उत्पन्न काढण्याचे काम सुरु आहे. यात बऱ्याच ठिकाणी मागील वर्षीपेक्षा अधिक धान पिकाचे उत्पादन आल्याचे अधिकारी सांगत आहेत.काही ठिकाणी मात्र उत्पादन कमी आले असल्याचीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यावरून भातपिकांचा उत्पन्न कुठे आनंद तर कुठे दु:ख देत असल्याची भावना व्यक्त होत आहे. तथापि दुष्काळाच्या बाबतीत जेव्हा गावनिहाय अंतिम आणेवारी येईल तेव्हाच खरी बाब समोर येईल. धानाचे हलके पीक कापून झाले आहेत. आता जास्त दिवसाचे धानाचे पीकही कापणे सुरु झाले. त्यामुळे डिसेंबर अखेर अंतीम पैसेवारी येईल. त्यानंतरच कोणता गाव दुष्काळात समाविष्ट होईल याची स्पष्टता होईल.धानाच्या पिकांचे तणस झाले असताना धानाचे उत्पादन जास्त कसे हा सवाल आहे. त्यामुळे प्रामाणिक नियतीने अंतिम आणेवारी काढून तुमसर व मोहाडी तालुका दुष्काळ जाहीर करावा.-डॉ.पंकज कारेमोरे, काँग्रेस नेते, तुमसर.
आणेवारीने चोळले दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 9:30 PM
यावर्षीही दुष्काळाने शेतकऱ्यांची पाठ सोडली नाही. पाण्याअभावी शेतकऱ्यांनी मड्डा कापला. महसूल आणि कृषी विभागाने प्रत्यक्ष शेतात जावून करपले धान पीक बघितले. तरीही मोहाडी तालुका दुष्काळाच्या यादीतून वगळला. त्यावर आता नजर आणेवारी ६२ पैसे दाखवून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले.
ठळक मुद्देदुष्काळ जाहीर करा : मोहाडी तालुक्यातील १०८ गावांची आणेवारी ६२ पैसे