गर्भवती मातांची तपासणी : मध्यम व तीव्र कुपोषित बालकांवर उपचारपवनी : सावरला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रूग्ण कल्याण समिती अंतर्गत रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन कन्हाळगाव आयुर्वेदिक दवाखाना येथे करण्यात आले. या रोगनिदान शिबिराचे उद्घाटन रूग्ण कल्याण समितीच्या अध्यक्षा मनोरथा जांभुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाहुणे म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास मेश्राम, सरपंच माया बावनथळे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा किसनाबाई भानारकर होत्या. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत भैसारे, डॉ.विवेक बोदलकर, डॉ.अजयकुमार बुजाडे डॉ.संदीप येळमे उपस्थित होते.रोगनिदान शिबिरात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.अंशुल गभणे, बालरोगतज्ज्ञ डॉ.निशांत मोहरकर, नेत्रविकार तज्ज्ञ डॉ.विवेक बोदलकर यांनी रूग्णांची तपासणी केली. ७० गरोदर माता, ५० बालके, १४० नेत्ररुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात ४ जोखमीच्या माता तपासणी दरम्यान आढळून आल्या. त्यांना औषधोपचार करून पुढील तपासण्यांकरिता संदर्भीत करण्यात आले. ० ते ५ वर्षे वयोगटातील ५० बालकांची तपासणी करण्यात आली. मध्यम व तीव्र कुपोषित बालकांवर औषधोपचार करण्यात येऊन त्यांना पुढील उपचाराकरिता संदर्भीत करण्यात आले. शिबिरात अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत १४० रूग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात ३६ मोतीबिंदू रूग्ण, ४० दृष्टीदोष रूग्ण शोधण्यात आले. ३६ मोतीबिंदू रूग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेकरिता पाठविण्यात आले. ४० दृष्टीदोष रूग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास मेश्राम यांनी केले. संचालन डॉ.अजयकुमार बुजाडे यांनी तर आभारप्रदर्शन आरोग्य सहाय्यक चंद्रमणी मेश्राम यांनी केले.या शिबिरात प्राथमिक आरोग्य केंद्र सावरला अंतर्गत गावातील गरोदर माता, ० ते ५ वर्षे वयोगटातील बालके, दृष्टीदोष असणारे व अन्य रुग्णांनी रुग्णसेवेचा लाभ घेतला. कार्यक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सावरला, उपकेंद्र आयुर्वेदिक दवाखाना अंतर्गत कर्मचारी कुंदा सोमकुवर, प्रणिता सावरबांधे, मीनाक्षी सुपारे, सुरमन धुर्वे, निलीमा गावंडे, कविता जाधव, छाया घटारे, प्रणिता ढवळे, प्रदीप खोत, ईश्वर पचारे, सुधीर मेश्राम, अनिल सोनकुसरे, प्रवीण मेश्राम, दीक्षा राऊत, नलिना खोब्रागडे, देवरेषा खोब्रागडे, होमराज भाजीपाले व आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
सावरला आरोग्य केंद्रात रोगनिदान शिबिर
By admin | Published: March 19, 2017 12:24 AM