महाराष्ट्र शासनाने अजूनपर्यंत बावांथाडी नदीवरील घाट लिलाव केले नाहीत. त्यामुळे परप्रांतीयांचे फावत आहे. मध्यप्रदेश शासनाने बावनथडी नदीवरील अनेक घाट लिलाव केले आहेत. यात उत्तर प्रदेशातील रेती कंत्राटदाराने घाट घेतले आहेत. बालाघाट जिल्हा प्रशासनाने रेती घाट लिलाव प्रक्रिया राबविली. उत्तर प्रदेशातील एका मोठ्या कंपनीने हे रेती घाट घेतले आहेत. सुकली येथील रेल्वेस्थानकावर रॅक पॉइंट तयार केले आहेत. येथून रेती निर्यात केली जात असल्याची माहिती आहे. रेतीच्या सुरक्षेकरिता खाजगी सुरक्षा गार्ड सदर कंत्राटदाराने नेमले आहेत. परप्रांतात रेती निर्यात करता येते का, हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे. बावनथडी नदीवर राज्याचा हक्क :
महाराष्ट्र, मध्यप्रदेशच्या सीमावर्ती नदीने निश्चित केले आहे. अर्ध्या नदीवर मध्यप्रदेशाचा, तर अजून अर्ध्या नदीवर महाराष्ट्राचा हक्क आहे. मध्यप्रदेशातील कंत्राटदार राज्याच्या सीमेतून रेतीचे उत्खनन करीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्याचे मोठा महसूल बुडत आहे. येथे जिल्हा प्रशासनाने चौकशी करण्याची गरज आहे. बावनथडी नदीतून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा होत असल्याने भावात थोडी नदीचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. रेती उत्खननाचे नियम येथे पायदळी तुडवले जात असल्याची माहिती आहे. नदीमध्ये मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे नदीचा प्रवाह महाराष्ट्राच्या सीमेकडे येण्याचा धोका निर्माण झाला आहे.
जलसंकटाची भीती :
बावनथडी नदीवर अनेक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. यात तुमसर तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांचा समावेश असून, मध्यप्रदेशातील तिरोडी व कटंगी येथील पाणीपुरवठा योजना आहेत. नदीपात्रातून बेसुमार रेतीचा उपसा केल्यामुळे नदीमध्ये पाणी न राहण्याची भीती निर्माण झाली आहे. उन्हाळ्यामध्ये पाणीपुरवठा योजना बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
जिल्हा प्रशासन लक्ष देणार का? :
बावनथडी नदी ही दोन्ही राज्यांची जीवनदायिनी आहे. नियमानुसार रेती घाट मध्यप्रदेश शासनाने केले आहेत; परंतु महाराष्ट्राच्या हद्दीतून रेती उपसा होत असल्याची दखल जिल्हा प्रशासनाने घेण्याची गरज आहे महसुलीच्या नुकसानाबरोबरच पर्यावरणाच्या मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विशेष चौकशी पथक नेमून कारवाई करण्याची गरज आहे.
रेती निर्यातीचे धोरण :
भंडारा जिल्ह्यातील घाटातून मोठ्या प्रमाणावर ट्रक व टिप्परने रेती वाहतूक केली जाते; परंतु प्रथमच रेल्वेने रेती वाहतूक होत असल्याने हा पहिलाच प्रकार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची गरज आहे. परप्रांतात रेती वाहतूक करता येते काय, याबाबतही शंका उपस्थित होत आहे. मध्यप्रदेशातील सुकळी येथील पॉइंटवर असलेला रेतीसाठा रेल्वेने जात असल्यास त्याची दखल घेण्याची गरज आहे.