लाेकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाच्या सममधील पावसाळ्याचे पूर्वी रेती, माती, लाकडी ओंडके व अन्य केरकचऱ्याचा उपसा करण्यात आलेला नाही. यामुळे पावसाळ्यात नदीच्या पात्रातून पाण्याचा उपसा अडचणीत येणार आहे. पाण्याचा उपसा करणाऱ्या पंपात तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाच्या यांत्रिकी विभागाने वातानुकूलित खोलीत बसून निर्णय घेत असल्याने प्रकल्पाला अडचणीचा सामना करावा लागणार आहे. महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात नदीच्या पात्रातील पाण्याचा उपसा करण्यासाठी सम (टाकी) ची निर्मिती करण्यात आली आहे. नदीपात्रातील पाणी सममध्ये जमा करण्यात येत आहे. या सममध्ये नदीपात्रातील लाकडी ओंडके येणार नाही, यासाठी जाळी लावण्यात आली आहे; परंतु जाळीची नासधूस झाली असल्याने पुराचे पाण्यात वाहून येणारे लाकडी ओंडके, केरकचरा थेट सममध्ये शिरत असल्याने पंपाचे अडचणी वाढवीत आहेत. टाकीत गत अनेक वर्षांपासून रेती, माती आणि लाकडी ओंडके, केरकचरा जमा झालेला आहे. रेतीचे ढीग तयार झाले असल्याने नदीच्या पात्रातील पाणी टाकीत जमा होत नाही. टाकीच्या दिशेने असणाऱ्या नदीपात्रातील पाण्याचे प्रवाहात बदल झालेला आहे. यामुळे पाण्याचे प्रवाहात गती दिसून येत नाही. अखेरच्या क्षणात पाण्याचा उपसा बंद करण्यात येत आहे. प्रकल्प वर्षभरातून फक्त तीन महिने पाण्याचा उपसा करीत आहे. यामुळे टाकीतील रेतीचा उपसा करण्याची मागणी आहे. वातानुकूलित खोलीत बसून नियोजन तयार करण्यात येत आहे. सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पातील समस्या व अडचणी निकाली काढण्यासाठी जून महिन्याचा कालावधी शिल्लक आहे; परंतु नियोजनाचा थांगपत्ता नाही. अधिकाऱ्यानी अद्यापपर्यंत प्रकल्पस्थळात आढावा घेतला नाही. पंपगृहात समस्या आहेत.
प्रकल्प वाऱ्यावर सोडले - प्रकल्प अडचणीत पाण्याचा उपसा करीत आहे. डागडुजीत डोलारा सुरू आहे. नियंत्रण सुटल्याने प्रकल्प स्थळात वांधे वाढले आहेत. पंपांची देखभाल व दुरुस्ती करण्यात विलंब करण्यात येत आहे. टाकीतील गाळ उपसा करण्यात आला नाही. नदीपात्रातील झुडपे, माती व रेतीचे ढिगारे काढण्यात आले नाहीत. टाकीच्या समोरील गाळ उपसा करण्यात आला नाही. यामुळे प्रकल्प वाऱ्यावर सोडण्यात आल्याचा अनुभव येतो आहे.