चुल्हाड (सिहोरा) :- वैनगंगा नदीच्या काठावर असणाऱ्या तामसवाडी गावांचे शिवारात रेतीचा राजरोसपणे उपसा वाढला आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने रेतीची वाहतूक केल्यानंतर अन्य जागेत डम्पिंग करण्यात येत आहे. रात्री या रेतीचा उपसा ट्रकमध्ये करण्यात येत आहे. असे असले तरी रेती चोरी थांबविण्याचे गावकऱ्यांचे सकारात्मक निर्णयाला प्रशासनाने खो दिला आहे. यामुळे रेती माफिया, प्रशासनाचे विरोधात गावकरी धरणे आंदोलन करणार आहेत.
वैनगंगा नद्याचे काठावर असणाऱ्या तामसवाडी, सीतेपार गावांचे शिवारात नदीच्या पात्रातून राजरोसपणे रेतीची चोरटी वाहतूक सुरू आहे. ट्रॅक्टरच्या साहाय्याने रेतीची वाहतूक करण्यात येत आहे. सीतेपारात ट्रकमध्ये रात्री रेतीचा उपसा करण्यात येत आहे. रेती माफियांचा हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. रात्रीच रेतीची ट्रकने वाहतूक करण्यात येत असल्याने गावकऱ्यांना माहिती होत नाही. रेती माफियांच्या समोर कुणी बोलायला तयार होत नाही. या रेतीच्या चोरट्या व्यवसायात बडे आसामी सहभागी झाले आहे. रेती माफिया रेतीला नगदी पीक म्हणून गणले जात आहे. यामुळे लहान मोठे रेतीचे चोरटे या व्यवसायात गुंतले आहेत. दरम्यान तामसवाडी गावातून होणाऱ्या रेती वाहतुकीला गावकऱ्यांनी विरोध केला आहे. भरधाव वेगात वाहने धावत असल्याने नागरिकांचे जीव वेशीवर टांगले जात आहेत. दिवस रात्र रेतीचे ट्रॅक्टर आणि ट्रक गावातील रस्त्यावरून धावत असल्याने गावकरी संतापले आहेत. जड वाहतुकीने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडले असल्याने गावातील लहान बालके खड्ड्यात आदळत आहेत.
यामुळे रेतीची चोरटी वाहतूक बंद करण्यासाठी महसूल विभागाला गावकऱ्यांनी अनेक पत्र दिले आहेत. चर्चा बैठका झालेल्या आहेत. पोलिसांपर्यंत थेट निवेदन पोहोचले आहे. गावकऱ्यांना आश्वासनाचे गाजर देण्यात आले आहे. गावकरी पोलीस चौकी अथवा दोन पोलीस, तलाठी यांचे नियुक्तीच्या मागणीवर अडले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून गावकरी नागरिकांना सुरक्षित करण्यासाठी भांडत आहेत. प्रशासनाच्या असहकार्यामुळे नागरिकांचा जीवच भांड्यात अडकला आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात पोलीस, तलाठी नियुक्तीकरिता जागेची पाहणी केली आहे. ग्रामपंचायतने शाळेची खोली या अभिनव कार्यासाठी दिली आहे.
गावकऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळत असतांना प्रशासनातील अधिकारी नाकतोंड दाबत आहेत. महसूल विभागाचे गावातून परतल्यावर पुन्हा कधी आले नाही. शाळेच्या खोलीत पोलीस, तलाठी यांची हजेरी लागली नाही. यामुळे गावकरी संतापले आहेत. प्रशासनाच्या विरोधात गावकरी धरणे आंदोलन करणार आहे. रेती माफियांच्या विरोधात गावात पोळा फुटण्याची शक्यता आहे. अखेरचे निवेदन गावकरी देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासनाने वेळीच दखल घेतली पाहिजे.
बॉक्स
पांजरा, सीतेपारात गुपचूप गुपचूप :
रेतीच्या चोरट्या वाहतुकीसाठी प्रसिध्द असणाऱ्या पांजरा घाटावरून बेधडक रेतीची चोरटी वाहतूक सुरू आहे. या घाटावरून जिल्ह्यातील बडे रेती माफिया ट्रकमध्ये रात्री रेतीचा उपसा करीत आहेत. दिवस असताना शांत दिसणारा पांजरा घाट वाहनांनी गजबजून जात आहे. गावापासून लांब असणाऱ्या या घाटावर येणाऱ्या वाहनाचा गावकऱ्यांना त्रास नाही. यामुळे कुणी बोंबलत नाहीत. पांजरा घाटावरून रेतीचा उपसा करण्यात आल्यानंतर सीतेपारात डम्पिंग केले जात आहे. या रेतीची उचल रात्रीच करण्यात येत आहे. यामुळे या डम्पिंगमध्ये असे काही घडलेच नाही. असे सांगण्याचा प्रयत्न रेतीचे माफिया करीत आहेत. पांजरा आणि सीतेपारात गुपचूप गुपचूप रेतीचा अवैध व्यवसाय सुरू आहे. नागरिकांच्या मागणीवरून या घाटावर पोलीस व तलाठी तैनात का केले जात नाही.