मोहन भोयर ।आॅनलाईन लोकमततुमसर : महसूलात वाढ करून पर्यावरण रक्षण, नदी संरक्षण करण्याचा शासनाचे नियम आहेत, परंतु वैनगंगा नदीपात्रात भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या सीमेतून पोकलॅन्ड मशीनने नियमबाह्य अवैध रेतीचा उपसा मागील काही महिन्यापासून सर्रास सुरू आहे. तामसवाडी सि. व चांदोरी घाट सीमेवर हा प्रकार सुरू आहे. प्रशासनाची सुट व रेतीची लुट असाच काहीसा धक्कादायक प्रकार सुरू आहे.राज्य शासनाने रेती घाट लिलाव करतानी अतिशय कडक नियमावली तयार केली आहे. काही बाबी वगळता रेती उत्खनन करण्याचे नियम आहेत. परंतु मशीन नदी पात्रात घालून रेती उत्खनन करता येत नाही. भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या सीमा भिडल्या आहेत. वैनगंगा नदीमुळे दोन्ही जिल्ह्याच्या सीमा ठरल्या आहेत. वैनगंगेचे पात्र येथे विस्तीर्ण आहे. अर्धा नदी पात्र भंडारा व अर्धे नदी पात्र गोंदिया जिल्ह्याच्या सीमेत आहे. याचा फायदा घेत रेती कंत्राटदारांनी घेतला आहे.तुमसर तालुक्यातील तामसवाडी सि. व इतर गावे व गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील चांदोरी गाव नदी काठावर आहे. सीमेवरील नदीघाट लिलाव झाले आहे. महसूल विभागाने सीमांकन निश्चितच करून दिले आहे, परंतु नदी पात्रात नेमकी सीमा सुरू होते ते कळत नाही. येथे नदी पात्रात सर्रास पोकलॅन्ड मशीनने अवैध रेती उत्खनन मागील काही महिन्यापासून सुरू आहे. नदी पात्रात वाहणाऱ्या प्रवाहाजवळून रेती उत्खनन सुरू आहे. पाणी प्रवाहाजवळून नियमानुसार रेती उत्खनन करता येत नाही, परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. नदीपात्रात पोकलँन्ड दिसत आहे, परंतु महसूल प्रशासनाने अद्याप कोणतीच दखल घेतली नाही. सीमेचा फायदा येथे कंत्राटदार घेतानी दिसत आहे.नदीपात्रात खोल खड्डेतुमसर तालुक्यातील वैनगंगा नदी काठावरील उमरवाडा बोरी, कोष्टी, बाम्हणी या गावांना धोका निर्माण झाला आहे. अति रेती उत्खननामुळे नदी पात्रात खोल खड्डे पडल्याने पाण्याचा प्रवाह या गावाच्या दिशेने येण्याची शक्यता नाकारता येत नाही. भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या वैनगंगा नदीपात्रात सर्वत्र खड्डेच खड्डे पडलेले दिसतात. अनेक ठिकाणी रेती नसून मातीचा तळ गाठला आहे.प्रशासन गप्पनदी पात्रात मशीनने अवैध रेती उत्खनन सुरू असतानी प्रशासन मात्र गप्प दिसत आहे. कंंत्राटदार व राजकारण्यांचे हितसंबंध गुंतल्याची चर्चा आहे. चांदोरी येथील ग्रामस्थांनी लेखी तक्रार प्रशासनाने केली आहे, परंतु साधी चौकशी झाली नाही. विस्तीर्ण नदी पात्र असल्याने कंत्राटदार येथे गब्बर होत आहे.भंडारा व गोंदिया जिल्ह्यांच्या सीमा भिडल्या आहेत. नदी पात्राचे सीमांकन ठरले आहे. मशीनने रेती उत्खनन करता येत नाही. अक्षांक्ष व रेखांश या तांत्रिक बाबींची माहिती घेऊन भंडारा जिल्ह्यातून रेती उत्खनन सुरू असेल तर नियमानुसार कडक कारवाई केली जाईल.-गजेन्द्र बालपांडे,तहसीलदार तुमसर.
भंडारा-गोंदिया जिल्हा सीमेतून रेतीचे खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 11:46 PM
महसूलात वाढ करून पर्यावरण रक्षण, नदी संरक्षण करण्याचा शासनाचे नियम आहेत, परंतु वैनगंगा नदीपात्रात भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या सीमेतून पोकलॅन्ड मशीनने नियमबाह्य अवैध रेतीचा उपसा मागील काही महिन्यापासून सर्रास सुरू आहे.
ठळक मुद्देपोकलॅन्डचा उपयोग : तुमसर तालुक्यातील गावांना धोका