कुकडे यांचा आमसभेत प्रश्न : अधिकाऱ्यांकडून नाममात्र कारवाईची खंतकरडी : नदीघाटात पोकलँड, जेसीबीने रेतीचे उत्खनन करण्याची परवानगी नाही. तसेच सीमांकनाबाहेर रेतीचा अवैध उपसा बेटाळा, सुकळी व निलज बुज घाटावरुन होत आहे. मजुरांचा रोजगार यात बुडविला जात असतांना अधिकारी नाममात्र कारवाई करीत असल्याचा प्रश्न कान्हळगावचे उपसरपंच दिगांबर कुकडे व निलज खुर्दचे उपसरपंच दिगांबर माने यांनी मोहाडी पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेत मांडला. सर्वसामान्यांवर कारवाई करणारे अधिकारी रेतीघाट चालकांवर कारवाई करण्यास का घाबरतात याचे उत्तर सभाध्यक्ष व संबंधित अधिकाऱ्यांना मागितल्याने प्रशासनात खळबळ उडाली.मोहाडी पंचायत समितीची आमसभा पार पडली. यात तालुक्यातील अवैध रेती उत्खननावर प्रकाश टाकण्यात आला. बेटाळा, निलज बुज, सुकळी व वैनगंगा नदीवरील सर्व घाटावर पर्यावरणाचे व शासनाचे नियम, कायदे पायदळी तुडविले जात आहेत. बेकायदेशिरपणे अवैधरेतीचा उपसा करीत ५०० च्यावर ट्रक जात आहेत. परवानगी नसतांना घाटावरुन पोकलँड व जेसीबीने रेतीचा उपसा सुरु आहे. या सर्व प्रकारामुळे गरिबांचा, मजुरांचा रोजगार बुडाला आहे. ज्या गावात रेतीघाट सुरु आहेत, त्यांना रोजगार देण्यासाठी रोजगार हमीची गरज पडली नसती. परंतू तसे होतांना दिसत नाही. अधिकारी वर्गाकडून कडक कारवाई होत नाही. नदीपात्रातून रेतीचा अवैध उपसा करुन काठावर खुलेआम डंपींग केल्या जावून तेथूनही रेतीची अवैध वाहतुक सुरु आहे.रेतीघाटाचे सिमांकन करतांना सरपंच किंवा ग्रामपंचायतीला नोटीस देणे गरजेचे असतांना दिले जात नाही. सिमांकनाबाहेरील क्षेत्रातून अवैध रित्या उपसा केला जात आहे, अधिकारी येतात तेव्हा घाटावरुन पोकलँड व जेसिबी बाहेर काढली जाते. यांना माहिती कोण व कशी देतो, आदी प्रश्न कान्हळगावचे उपसरपंच दिगांबर कुकडे व निलज खुर्दचे उपसरपंच दिगांबर माने यांनी मोहाडी पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेत उपस्थित केला.रेतीघाटावर कॅमेरे, अटी व शर्तीची सुचना देणारे माहिती फलक लावण्याची मागणी करीत, सामान्यांवर ज्या तातडीने कारवाई होते त्याच पध्दतीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.यासंबंधाने मोहाडी तहसील कार्यालयाला तक्रारी प्राप्त झाल्यात. जप्तीची कारवाई करुन अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती तहसीलदार जयंत पोहनकर यांनी दिली. अवैध रेती उपसा व अन्य प्रकरणी रेती माफिया, वाहतुकदार व साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे धोरण नविन कायद्यानुसार केले जाणार असल्याचे उपविभागीय अधिकारी सोनुले यांनी सांगितले. ग्रामपंचायतीला नोटीस दिली पाहिजे, कॅमेरे, माहिती फलक तसेच सिमांकनाबाहेर होणारे अवैध उत्खनन थांबविण्याबरोबरच कार्यवाहीच्या सुचना आमदार तथा सभाध्यक्ष चरण वाघमारे यांनी दिल्या. जांभोरा येथील दोन्ही राशन दुकानदारांकडून ३५ क्विंटल राशनची अफरातफर केली गेली. प्रकरण अनेकदा तहसीलदार व वरिष्ठांना तक्रार देवूनही पोलिसात गुन्हा नोंदविला गेला नाही. तसेच न्यायालयाच्या आदेशानंतरही जांभोरा येथील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आलेले नाही, न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना केली जात असल्याचा मुद्दा सरपंच भूपेंद्र पवनकर यांनी मांडला. रोहयो अंतर्गत वर्षभरापूर्वी कामे झालेली असतांना मजुरांना मजुरी मिळाली नसल्याचा प्रश्न आंभोरा, निलज खुर्द, विहिरगावातील सरपंच उपसरपंच यांनी मांडला. रोहयो मंत्र्यांना खंड विकास अधिकाऱ्यांनी कुणाचेही पेमेंट थांबलेले नसल्याची चुकीची माहिती दिली. (वार्ताहर)
जेसीबी सीमांकनाबाहेर रेतीचे खनन
By admin | Published: March 27, 2016 12:27 AM