लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंध करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, दंडाच्या रकमेत प्रचंड प्रमाणात वाढ केली. प्रशासकीय यंत्रणेतील काही स्वार्थी लोकसेवकांमुळे शासनाची उद्देशपूर्ती होत नाही. याचा प्रत्यय पालांदूर परिसरातील मऱ्हेगाव व नरव्हा रेतीघाटावर आला. रेती तस्करांसोबत स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांचे संगनमत व राजकीय वरदहस्तामुळे अवैध रेती उत्खनन व वाहतूक जोमात सुरू आहे.
चुलबंद नदीमुळे लाखनी व लाखांदूर तालुक्याची सीमा निर्धारित होते. चुलबंद खोरे दुर्गम व अविकसित परिसर असल्यामुळे पूरपरिस्थिती वगळता, इकडे अधिकाऱ्यांचे दौरे होत नसल्यामुळे स्थानिक कर्मचाऱ्यांची चलती आहे. रेतीघाट महसूल आणि खनिकर्म विभागाचे अखत्यारित येत असल्यामुळे स्थानिक तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचे सनियंत्रण असते. चुलबंद रेती घाटातील रेती बारीक व पांढरी शुभ्र तथा उच्च प्रतीची दर्जेदार असल्यामुळे सीमावर्ती जिल्ह्यातही मोठी मागणी आहे, पण रेती घाटाचे लिलाव झाले नसल्यामुळे रेती तस्करांचा उदय झाला आहे.
रेती तस्कर आणि स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांत अर्थकारणामुळे गौणखनिज उत्खनन आणि वाहतूक खुलेआम सुरू असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. मऱ्हेगाव व नरव्हा रेती घाटालगत लाखांदूर तालुक्यातील दिघोरी रेती घाट आहे. महसूल किंवा पोलीस विभागाचे पथक रेती माफियांवर धाड मारण्यास गेल्यास रेती तस्कर दिघोरी घाटाकडे मोर्चा वळवितात. त्यामुळे पथकास खाली हात परतावे लागते. त्यामुळे मऱ्हेगाव व नरव्हा रेती घाटावर रेती तस्करांचे साम्राज्य आहे. तालुक्यात उड्डाणपूल, कालवे, विविध शासकीय योजनांचे बांधकाम तथा घरकुलांचे बांधकाम सुरू असल्यामुळे, रेतीला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने रेतीचे भाव वधारून रेती तस्करासह साठगाठ करणारेही मालामाल होत असल्याचे चित्र दिसत आहे.
बॉक्स
अवजड वाहतुकीने रस्त्याची दुर्दशा
मऱ्हेगाव, तसेच लोहारा-नरव्हा ते रेतीघाट हा ग्रामीण मार्ग असल्याने, त्याची भार वाहतूक क्षमता ५ टन आहे, पण या रस्त्याने अवैध रेतीच्या ट्रॅक्टरची ओव्हर लोड वाहतूक सुरू असल्याने, रस्त्याला ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.