भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा, चुलबंद, बावनथडी या नद्यांच्या घाटांवर माेठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे. मध्यंतरी रेती तस्करीवर आळा घालण्यात आला हाेता. काही रेती घाटांचे लिलावही करण्यात आले. मात्र गत पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात काेराेनाचा उद्रेक झाला. दरराेज हजार ते १२०० रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे संपूर्ण प्रशासन काेराेना संसर्ग प्रतिबंधासाठी झटताना दिसत आहे. याच संधीचा फायदा जिल्ह्यातील रेती तस्कर घेत आहेत.
तुमसर, माेहाडी, भंडारा, पवनी तालुक्यातील रेती घाटांवरून अहाेरात्र रेतीची वाहतूक केली जात आहे. विशेष म्हणजे संचारबंदी असताना ही तस्करी खुलेआम सुरू आहे. एकीकडे बांधकाम मजुरांना संचारबंदीत बंधने घातलीत. मात्र रेती तस्करीत असणारे मजूर मात्र दरराेज नदीपात्रात एकत्र येऊन रेतीचा उपसा करतात. कंत्राटदाराच्या माध्यमातून त्यांना एकत्र आणून रेतीचा उपसा केला जात आहे. जेसीबीच्या माध्यमातून उत्खनन करून वाहतूक केली जात आहे. या सर्व प्रकाराकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष हाेत आहे.
वलनी येथे रेती जप्त
रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक करणारा ट्रॅक्टर पाेलिसांनी पवनी तालुक्यातील वलनी ते आसगाव दरम्यान जप्त केला. या ट्रॅक्टरमधून चार ब्रास रेती जप्त करण्यात आली. याप्रकरणी राजेंद्र गंगाधर सावरबांधे आणि मंगेश सावरबांधे रा. आसगाव यांच्याविरुद्ध गुन्हा नाेंदविला आहे.