भंडारा : पवनी तालुक्यातील रेती घाटावरून रेतीची खुलेआम तस्करी सुरू आहे. शेकडो वाहने भिवापूरमार्गे दररोज नागपूरला रेती घेऊन जात आहेत. या प्रकाराकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष असून, पोलिसांनी केलेल्या कारवाईत मंगळवारी सहा ब्रास रेतीसह टिप्पर जप्त करण्यात आला आहे.
पवनी तालुक्यात असलेल्या रेतीघाटावर गत सहा महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन सुरू आहे. पवनी तालुक्यातील रेती नागपूर येथे ट्रक-टिप्परद्वारे नेली जात आहे. तालुक्यातील काही घाटांचे लिलाव झाले असले तरी अद्यापही अनेक घाट लिलावाच्या प्रतीक्षेत आहेत. अशा परिस्थितीत रेती तस्कर या घाटांवर तळ ठोकून आहेत. मंगळवारी पवनीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गस्त घालीत असताना न्यायालयासमोर त्यांना रेती वाहतूक करणारा टिप्पर आढळून आला. पोलिसांनी हा टिप्पर जप्त करून टिप्परचालक विजय रमेश कांबळे, रा.गुडेगाव, ता.पवनी आणि धनपाल अंबादास गभणे (२४, रा.गुडेगाव) या टिप्पर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या टिप्परमध्ये सहा ब्रास रेती आढळून आली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पांगरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पवनी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवापूरमार्गे रेती नागपुरात
पवनी तालुक्यातील उच्च दर्जाच्या रेतीला नागपूरमध्ये मोठी मागणी आहे. त्यामुळे अनेकजण या व्यवसायात गुंतले आहेत. जेसीबीच्या साहाय्याने घाटांवर उत्खनन करून ट्रक-टिप्परद्वारे रेतीची वाहतूक केली जाते. पवनी तालुक्यातून भिवापूरमार्गे रेती बिनधास्तपणे पोहचविली जात आहे. याप्रकाराकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे.