भंडारा : अवैध रेती वाहतूक प्रकरणात जप्त करण्यात आलेला ट्रॅक्टर चक्क येथील तहसील कार्यालयाच्या आवारातून सोमवारी चोरीस जाण्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी रात्री उशिरा भंडारा ठाण्यात तक्रार देण्यात आली.
विनापरवाना रेती वाहतूक प्रकरणात महसूल पथकाने ट्रॅक्टर (क्रमांक एमएच ३६ एल ५९४४) १२ ऑक्टोबर रोजी जप्त केला होता. जप्तीत एक ब्रास रेतीही आढळून आली होती. या वाहन मालकाला १७ हजार ९०० रुपये दंड आकारण्यात आला होता. जप्तीनंतर हा ट्रॅक्टर भंडारा तहसीलच्या आवारात लावून ठेवण्यात आला होता. दरम्यान, सोमवारी हा ट्रॅक्टर तेथे आढळून आला नाही. शोधाशोध केली असता कुठेही थांगपत्ता लागला नाही. अखेर रात्री १० वाजता भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
जप्तीतील ट्रॅक्टर तहसीलच्या आवारातून चोरीस जाण्याच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत. मोहाडी आणि साकोली तहसीलच्या आवारातूनही वाहन चोरीस गेले होते. या प्रकरणात ट्रॅक्टरमालकांची कसून चौकशी केल्यास खरे गौडबंगाल बाहेर येऊ शकते.