पवनीतील प्रकार: चौथा शनिवार रेती माफियांसाठी सुगीचा अशोक पारधी । लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : वैनगंगा नदीपात्रातील रेतीचा रात्रंदिवस अवैधरित्या मोठ्या प्रमाणात उपसा करून जिल्ह्याबाहेर पाठविल्या जात आहे. शनिवारला सकाळी ६.३० ते ७ च्या दरम्यान ट्रक व टिप्परमध्ये ओवरलोड रेती भरून वाहतूक करताना पवनीकरांनी अनुभवले. अर्ध्या तासात २०० च्यावर ट्रक एकापाठोपाठ एक जाताना पाहिले. मात्र तपासणी नाक्यावर वाहनांची कोणतीही नोंद करण्यात आली नाही. त्यामुळे चौथा शनिवार रेती माफियांसाठी सुगीचा दिवस ठरत असल्याची पवनीत चर्चा आहे.वैनगंगा नदी पात्रातील रेतीचा उपसा व त्याची वाहतूक याकडे जिल्हा व तालुकास्तरावरील खनिकर्म व महसूल अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्याचा परिणाम शासनाचा महसूल बुडत आहे. रेती घाटांचे लिलाव झाल्यानंतर नियम, अटी व शर्तीचे पालन करण्याची जबाबदारी रेती ठेकेदारांची असते. त्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी पर्यवेक्षण करणाऱ्या यंत्रणेची असते. परंतू नियम धाब्यावर बसवून जास्तीत जास्त पैसा कमविणे या एकाच नियमाचे पालन रेती व्यवसायात होत आहे. रेती माफिया व अधिकारी मालामाल होत असताना रेती वाहतुकीच्या टिप्पर ट्रकमध्ये दबून कित्येकांचा भर रस्त्यात बळी गेला आहे. मात्र अद्याप कारवाई झालेली नाही. रेती उत्खनन मोजून दिलेल्या जागेत व त्या पद्धतीने करणे गरजेचे असताना रेती ठेकेदार संपूर्ण नदीवर मालकी असल्याच्या अविर्भावात जेसीबीद्वारे रात्रंदिवस उत्खनन करीत असतात. अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्यामुळे नदीपात्रात खोल खंदक पडलेले आहेत व पात्राबाहेर रेतीचे अवाढव्य ढिग करून ठेवण्यात आले आहेत. रेती व्यवसायात गुंतवणुकीला अनुसरून वारेमाप उलाढाल होत असल्याने गुंडगिरी प्रवृत्ती बळावत आहे. पोलीस यंत्रणा चुप्पी साधून आहे. रेती व्यावसायीक पोलीस विभागाचे जिवलग मित्र झाले आहेत. शासनाला रेती व्यवसायावर निर्बंध ठेवावाचे असेल तर ड्रोन सिस्टम वापरून रेतीघाटावर लक्ष ठेवावे लागणार आहे. रेती घाटावरून रेतीच्या उपस्यावर निर्बंध घातल्याशिवाय पर्यावरण रक्षण करता येणार नाही. धरणामुळे नदीपात्रात निर्माण होणाऱ्या रेतीचे प्रमाण कमी झाले आहे. रेतीचा उपसा असाच सुरू राहिल्यास नदीमध्ये रेतीऐवजी गवत उगवलेले पाहायला मिळेल.
अर्धा तासात दोनशेच्यावर ट्रकमधून रेतीची वाहतूक
By admin | Published: May 28, 2017 12:26 AM