स्तुत्य उपक्रम : ग्रामपंचायत कवलेवाडाचा पुढाकार
पालांदूर : वाढता कोरोना नियंत्रणात ठेवण्याकरिता स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नात आणखी भर घातली. ग्रामपंचायत कवलेवाडाच्या वतीने गर्दीच्या ठिकाणातील बँक, बाजार चौक व इतर बैठकीच्या ठिकाणी सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली आहे.
‘एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या म्हणीप्रमाणे गावची ग्रामपंचायत आरोग्य व्यवस्थेला हातभार लावीत आहे.
जनसामान्यांना कोरोना नियंत्रणाकरिता वारंवार शासनाने पुरविलेली माहिती भ्रमणध्वनीद्वारे, सोशल मीडियाच्या माध्यमातून, भिंती पत्रकातून प्रसिद्ध करीत सर्वसामान्यांना अद्यावत माहिती पुरविण्याचे काम ग्रामपंचायत कवलेवाडाचे सरपंच केशव बडोले, उपसरपंच स्वप्निल खंडाईत व पदाधिकारी प्रामाणिकतेने करीत आहेत.
पालांदूर व कवलेवाडा ग्रामपंचायत कोरोना संकटात एकमेकांच्या सहयोगाने जनसामान्यांना कोरोनाविषयीची माहिती पुरवत आहेत.
गर्दीच्या ठिकाणी व मुख्य रस्त्यांवरही सॅनिटायझर फवारणी होत आहे. यामुळे कोरोना नियंत्रणाकरिता मोठी मदत होत आहे. गर्दी टाळण्यासाठी शासनाने पुरविलेल्या वेळापत्रकानुसार बाजारपेठ सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू आहे. दुपारच्या सत्रात सगळे रस्ते सामसूम दिसत आहेत. कोरोनाचे दुष्परिणाम सगळ्यांना सावध करीत आहेत. जागरूक लोक निश्चितच घरात बसून आहेत. तरुणाई मात्र ऐकण्याच्या मुळात नसून, चौकात आडोशाला मोबाइलच्या सोबतीने बसलेली दिसतात. पोलीस दिसताच चालते होतात. तरुणाईवर नियंत्रण गरजेचे झाले आहे. ग्रामीण भागात कोरोणाचे रुग्ण संख्या दिवसेंदिवस नियंत्रित होत आहे, हे विशेष!