राजू बांते
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : साहस, इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नसते. याचा प्रत्यय ग्रामीण भागातील एका तरुणाने आणून दिला. कधीकाळी गुरे राखणारा आता अभिनेता, दिग्दर्शक झाला. गुराखी ते अभिनेता असा संघर्षमय प्रवास करणारा हा तरुण आहे मोहाडी तालुक्यातील कन्हाळगाव येथील संजय मोहारे.
एखाद्या चित्रपटात शोभावी असे ही जिद्दीची कहाणी आहे. संजूचे प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर गावात काही गुरे चारली. त्यानंतर तुमसर येथे बीएस्सी केले. ध्येयाचा पाठलाग करण्यासाठी २००४ साली गाव सोडले. नागपुरात बाॅक्सिंगचे प्रशिक्षण घेतले. मात्र, प्रशिक्षणात जखमी झाल्याने त्याला बाॅक्सिंग सोडावे लागले. त्यानंतर नागपुरात सायकल रिक्षा चालवू लागला. नाटक कंपनीतही काम करीत होता. संजूने त्यावेळी ५० ते ६० नाटकांत काम केले. घरून कोणतीही आर्थिक मदत नाही. त्यामुळे स्वत:च्या मेहनतीवर उदरनिर्वाह करून ध्येयपूर्तीकडे वाटचाल करीत होता.
आपल्या प्रतिभेला वाव मायानगरी मुंबईत मिळू शकते म्हणून त्याने २००५ मध्ये मुंबई गाठली. वेटरचे काम करीत असताना अर्धवेळ शूटिंगचे दिग्दर्शन करायचा. २००६ साली सेन्सार बोर्ड प्रतिनिधी प्रकाश कदम यांच्याकडे त्याला काम मिळाले. स्वत:च्या मुलासारखे संजूला वागवू लागले. कदम यांच्या निधनानंतर संजूची सचोटी आणि प्रामाणिकपणा बघून कदम यांच्या मुलींनी सेन्सार बोर्डाचे काम संजूकडे सोपविले. आठ वर्षे सेन्सार बोर्डाचा प्रतिनिधी म्हणून काम करीत होता. संजू मोहारे आता १५ वर्षांपासून मुंबईत राहत आहे. त्याने तेलगू, हिंदी सिनेमांत सहायक अभिनेता आणि ४० सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. सनी देओल यांच्या ‘सिंग ऑफ द ग्रेट’ या चित्रपटात सहायक दिग्दर्शकाचे काम केले. आता त्याची पावले चित्रपट निर्मितीकडे पडत असून अलीकडेच त्याने एका डाक्युमेंटरीची निर्मिती केली. आपल्या मायभूमीत तो याचे चित्रीकरण करणार आहे.
४० दिवस आर्थर रोड कारागृहात
सेन्सार बोर्डात प्रतिनिधी असताना तेथील बनावट प्रमाणपत्राचे प्रकरण पुढे आणले. १४ ऑगस्ट २०१४ मध्ये सीबीआयच्या मदतीने काही व्यक्तींना अटक झाली. मात्र, या धाडसी कामाचा परिणाम त्याला भोगावा लागला. केंद्रीय फिल्म प्रमाणपत्र बोर्डाच्या प्रतिनिधीचे काम काढण्यात आले. उपजीविकेसाठी त्याने भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. मोठ्या लोकांशी लढा देणे त्याला चांगलेच भोवले. ऑगस्ट २०१९ मध्ये याच प्रकरणात अटकविण्यात आले. तो ४० दिवस ऑर्थर रोड जेलमध्ये होता. मात्र आरोप सिद्ध झाला नाही आणि त्यातून सहीसलामत बाहेर पडला. या लढाईत मुंबईतील काही अभिनेत्यांनी संजूच्या पाठीवर हात ठेवला आणि त्यामुळेच आज तो मायानगरीत पाय रोवू शकला.