कांचन गडकरी यांचे प्रतिपादन : नूतन कन्या शाळेचा वार्षिकोत्सव सोहळा भंडारा : संस्कार ही जीवनाची खरी पुंजी असते. संस्काराची शिदोरी घेवूनच पुढील जीवनाची वाटचाल करीत उंच भरारी घ्यावी असे मौलीक विचार कलाप्रेमी व समाजसेवेचे व्रत स्वीकारलेल्या कांचन गडकरी यांनी व्यक्त केले. स्थानिक नूतन कन्या शाळेच्या वार्षिकोत्सव उद्घाटन सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या उद्घाटीका व संस्कार भारती नागपूरच्या अध्यक्षा कांचन गडकरी, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अमिताभ पावडे प्रसिद्ध स्तंभ लेखक व समीक्षक नागपूर, सुनिल मेंढे कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष मनोहरराव बोंगीरवार, संस्थेचे कार्यवाह अॅड.एम.एल. भुरे, मुख्याध्यापिका नंदा नासरे, उपमुख्याध्यापक मोहन दाढी उपस्थित होते. नाजूकपणा नव्हे तर सक्षम, सुदृढ, सशक्त, विवेकवादी व विज्ञानवादी दृष्टीकोण हेच स्त्रीचे खरे आभूषण आहे. किंबहुना मुलींमधील सशक्त स्त्रीसामर्थ्य जागृत करण्याचा संदेश प्रमुख अतिथी अमिताभ पावडे यांनी दिला. याप्रसंगी विज्ञान, कला, इतिहास, भूगोल प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका नंदा नासरे यांनी केले. नूतनच्या कलिका नितीमान व गतीमान घडविण्याचा मानस त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. उपस्थितांच्या हस्ते हस्तलिखीत कलिका व प्रतिबिंब या वार्षिक वार्तापत्राचे विमोचन करून तसेच नूतन कन्याची वेबसाईट लाँच करून उद्घाटन झाल्याचे जाहीर करण्यात आले. शाळानायीका स्नेहा निखाडे, सई आंभोरकर यांनी अहवाल वाचन केले. गुणवत्ताप्राप्त विद्यार्थिनींना स्मृतीचिन्ह, रोख रक्कम देवून तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडू विद्यार्थिनींना पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले. एन.सी.सी. बेस्ट कॅडेट अवार्ड २०१६ मोनिका सार्वे या विद्यार्थिनीला प्रदान करण्यात आला. शाळेचे शिक्षक हेच शाळेच्या वैभवाचे व यशाचे खऱ्या अर्थाने धनी आहेत असे मत प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष बोंगीरवार यांनी केले. देश बदलत आहे व बदलत्या प्रवाहात नूतनच्या कलिका एक पाऊल पुढे आहेत. देश उभारणीसाठी आवश्यक मनुष्यबळ याच कलिकांमधून निपजेल अशी सदिच्छा संस्थेचे कार्यवाह अॅड.एम.एल. भुरे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे औचित्य साधून स्मार्ट सिटी ही संकल्पना निलू तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी तयार केलेल्या पावर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे दाखविण्यात आली. शालेय विद्यार्थिनींनी विविध गाण्यावर नृत्य सादर केले. रोहिणी मोहरील यांच्या मार्गदर्शनात तयार झालेली नोटाबंदी ही नाटिका विद्यार्थिनींनी सादर केली. कार्यक्रमाचे संचालन वार्षिकोत्सवाच्या प्रभारी शिक्षिका निलू तिडके यांनी केले. पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षिका सीमा चित्रीव यांनी हस्तलिखीतांच्या अंतरंगाबद्दल माहिती करून दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक मोहन दाढी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता तू बुद्धी दे तू तेज दे या गीताने झाली. याप्रसंगी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य रेखा पनके, झवर, शेखर बोरसे, माजी शिक्षणाधिकारी प्रमोद पनके, प्रशासकीय अधिकारी इंदिरा गायकवाड, माजी प्राचार्या शीला भुरे त्याचप्रमाणे शिक्षक पालक संघाचे सदस्य व पालकवर्ग बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवृंदाचे सहकार्य लाभले. याकरिता व्यवस्थापक मंडळ व सर्व पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. (नगर प्रतिनिधी)
संस्कार ही जीवनाची शिदोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2017 12:31 AM