तुमसर (भंडारा) : एके काळी नईम शेखसाठी काम करणारा संतोष डहाट नंतर मात्र नईमवरच भार पडायला लागला. नईमला बाजूला सारून तो गुन्हेगारी विश्वात काम करायला लागला. तो भारी पडत असल्याचे पाहून २०२१ मध्ये नईम शेख याने आपल्या साथीदाराच्या मदतीने संतोष डहाटवर गोळीबार केला होता; पण त्यात तो बचावला. त्या गोळीबाराचा वचपा काढण्यासाठी संधीच्या शोधात असलेल्या संतोषने डाव साधला आणि सोमवारी सायंकाळी नईमचा खेळ खल्लास केला.
या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १० जणांवर गुन्हे दाखल केले असून, ७ जणांना अटक केली आहे. यात मुख्य सूत्रधार संतोष डहाट असून त्याचा भाऊ संतोष डहाट याच्यावरही या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेतील बहुतेक आरोपी सराईत गुंड आहेत. यावरून संतोषने बऱ्याच दिवसांपासून नईमच्या हत्येची योजना आखली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.
अशी आहे पार्श्वभूमी
संतोष डहाट हा पूर्वी नईम शेख याच्यासाठी काम करायचा. संतोषच्या माध्यमातून झालेल्या खून प्रकरणात तुरुंगात असताना नईमनेच संतोषला मदत केली होती. एवढेच नाही तर कारागृहातून बाहेर काढण्यासाठी नईमनेच संतोषला सहकार्य केले होते. मात्र, कारागृहातून बाहेर आल्यानंतर संतोषने नईमला बाजूला सारले आणि स्वत:च गुन्हेगारी विश्वात आला. त्यामुळे आपल्यावर डोईजड झालेल्या संतोषचा गेम करण्यासाठी नईमने संतोषवर २०२१ गोळीबार केला होता. मात्र, त्यात तो बचावला. त्यानंतर नईमचा गेम करण्याची संधी तो शोधू लागला होता, यातूनच हे हत्याकांड घडले.
नईमच्या कारमध्ये होते चार साथीदार
घटनेच्या वेळी नईम शेखच्या कारमध्ये त्याच्यासह कालू माटे, जावेद पठाण आणि शाहीद पठाण असे चौघे होते. शाहीद कार चालवीत होता.
नईम शेखवर होता मोक्काचा आरोप
नईम शेख याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोक्काचा आरोप लावण्यात आला होता. त्याचा साथीदार असलेल्या कालू माटेवरही हाच आरोप होता. मात्र, हायकोर्टाने दोघांवरीलही मोक्का हटविला, तर संतोषला जानेवारी-२०२३ मध्ये तुमसरमधून तडीपार करण्यात आले होते. शहरात येण्यास त्याच्यावर प्रतिबंध होता.
तुमसरातही देशी कट्टे
या हत्याकांडात देशी कट्ट्याचा वापर करण्यात आला. यापूर्वीही घडलेल्या घटनांमध्ये कट्ट्याचा वापर झाल्याची नोंद आहे. यामुळे तुमसरातील गुंडांकडे देशी कट्टे असल्याचा संशय वाढला आहे. शहरात सहा वर्षांपूर्वी तत्कालीन नगरसेवक प्रशांत उके यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून तुमसरातील गुन्हेगारी विश्वात कट्ट्याचा वापर करणे सुरू झाले. तुमसरमध्ये क्राइमचा ग्राफ दिवसेंदिवस वाढत असल्याने तो कमी करण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
२५ सप्टेंबरचा असाही योगायोग
चार वर्षांपूर्वी २५ सप्टेंबर २०१९ रोजी दुर्गा उत्सवादरम्यान बाबू बॅनर्जी या गुंडाची हत्या तुमसरात झाली होती. विशेष म्हणजे नईम शेख याची हत्या झाली ती तारीखही २५ सप्टेंबर हीच आहे. या विचित्र योगायोगामुळे शहरवासीयांना जुन्या घटनेची आठवण जागी झाली.