लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दहावीच्या परीक्षेत येथील सावित्रीदेवी शिवनारायण सारडा महिला समाज विद्यालयाचा विद्यार्थी विज्योत विजय सिल्लारे हा जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. त्याला बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये ४८१ गुण मिळाले मिळाले आहे. तर प्राईड कॉन्व्हेंटची अमिषा प्रमोद बेदपुरीया आणि मोहाडी येथील अनिमेश कैलास गभने बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये ४८० गुण घेवून जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले आहे. सावित्रीदेवी शिवनारायण सारडा महिला समाज विद्यालयाने यंदाही यशाची परंपरा कायम ठेवली असून या शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. दहावीतून जिल्ह्यात अव्वल ठरलेल्या विज्योतला अभियंता व्हायचे आहे. बारावीनंतर त्याला एरोनॉरटिकल किंवा मरीन इंजिनियरिंगमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. त्यादृष्टीने त्याने अभ्यासालाही सुरुवात केली आहे. त्याचे वडील गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात तर आई भंडारा येथील आठवले समाजकार्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. शिक्षणाचा वसा त्याला घरातूनच लाभला आहे. खासगी शिकवणीसोबतच त्याला मुख्याध्यापिका वैशाली धारस्कर यांच्यासह शिक्षकांनी मार्गदर्शन केले. संस्थेच्या अध्यक्ष डॉ. विशाखा गुप्ते, सचिव नूतन मोघे यांनी त्याचे कौतुक केले. भंडारा येथील प्राईड कॉन्व्हेंटची विद्यार्थीनी अमिषा प्रमोद बेदपुरीया जिल्ह्यात द्वितीय आली आहे. तिला बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये ४८० गुण मिळाले आहे. आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापिका प्रियंका रिनके यांना देत आहे. संस्थेचे संस्थापक राजेश काटगरे यांनी त्याचे कौतुक केले आहे. तर मोहाडी येथील सुदामा विद्यालयाचा विद्यार्थी अनिमेश कैलास गभने याला बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये ४८० गुण मिळाले आहे. त्याचे वडील शेतकरी असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने घवघवीत यश मिळविल्याने कौतुक होत आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. शाळांच्यावतीने विद्यार्थ्यांच्या घरी जावून त्यांचा सत्कार करण्यात आला.