पालांदूर : साप... म्हणजे सरपटत येणारा मृत्यू हाच अनेकाचा समज. पण ताेच साप जेव्हा एखादा सर्पमित्र पकडताे तेव्हा आश्चर्य वाटते. ही मंडळी साप कसे पकडत असतील त्यांना भीती वाटत नाही का असे एक ना अनेक प्रश्न निर्माण हाेतात. सापांचे जग अद्भूत आहेत. अशाच या अद्भूत जगतात सर्प प्रेमाने एक तरुण झपाटला आहे. आतापर्यंत त्याने अडीच हजारांवर विषारी, बिन विषारी सापांना जीवदान दिले आहे. हा तरुण आहे, लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील सर्पमित्र समित हेमणे.
समितीला लहानपणापासूनच निर्सगाची आवड आहे. त्यानंतर त्याने निसर्गातील प्रत्येक गाेष्टीचा अभ्यास सुरू केला. किडे, झाडे, वेली, प्राणी यासाेबतच सापांचाही अभ्यास सुरु झाला. त्यात त्याला सापाचे जग वैशिष्टपूर्ण वाटले. सापाच्या हालचाली रचना, रंग यामुळे त्याचे आकर्षण वाढत गेले. अनेक पुस्तके आणि सर्पतज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेत अभ्यास सुरू केला. पहिला साप त्याने ७ जून २०११ राेजी पकडला आणि तेथून सुरू झाला त्याचा सर्पमित्र म्हणून प्रवास.
समित सांगताे वनविभाग जसे इतर प्राण्यांच्या बाबतीत गावात शिरले की त्याला पकडून जंगलात साेडून देतात. परंतु सापासाठी कुणी धावून येत नाही, अनेकदा परिसरातील नागरिकच सापाला यमसदनी धाडतात. पालांदूर परिसरात असे मारले जाणारे अनेक साप त्याने बघितले. तेथूनच त्याने ठरविले की आता परिसरात सापाला मारू द्यायचे नाही. समित परिसरातील ३०-३५ गावात कुठेही साप निघाला की पकडायला जाताे आणि त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करताे. असा हा सर्पमित्र सध्या पालांदूर परिसरात सर्वांच्या उत्सुकतेचा विषय झाला आहे.
बाॅक्स
क्षणाचाही विलंब न लावता पाेहाेचताे गावात
कुणाच्या घरी साप निघाला की समितीला फाेन येताे ताे क्षणाचाही विलंब न करता थेट साप निघालेल्या घरी पाेहाेचताे. रात्र असाे, पाऊस असाे, ऊन असाे की वारा सापाला पकडून ताे जीवदान देताे. यामाेबदल्यात ताे काेणताही पैसा घेत नाही. आता त्याच्या साेबतीला सुहास हेमणे, आदेश गाेंदाेळे, दीनदयाल गिरीपुंजे, वैभव हेमणे, साहिल बुरांडे ही मंडळीही आली आहेत.