सिलेगाव ग्रामपंचायतमध्ये थेट निवडणुकीत सरपंचपदावर संध्या पारधी निवडून आलेल्या आहेत. त्यांच्या गटाचे सुखशाम येले उपसरपंच पदावर पोहोचले आहेत. दीड वर्ष गावात समन्वयातून कामे करण्यात आली आहेत, परंतु नंतर सदस्यांत समन्वय दिसून आलेला नाही. सदस्यांत दुफळी माजली. अर्धे सदस्य ग्रामसेविकाचे पक्षधर झाले, तर काही सदस्य सरपंचांच्या बाजूने आले. तीन वर्षांच्या कालावधीत ग्रामपंचायतीच्या प्रशासनात अनेक घडामोडी घडल्या आहेत. अहिल्याबाई होळकर सभागृह बांधकाम अडले आहे. ६५ लाख तसेच पडून आहेत. उपसरपंचाने राजीनामा दिला होता. परिचारकावर पदावरून हटविण्याची कुऱ्हाड कोसळली होती. प्रोसिडिंग बुकमध्ये खाडाखोड करण्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे गेल्या तीन वर्षांपासून ग्रामपंचायतीमध्ये ठीकठाक नव्हते. मासिक सभा कधी शांततेत पार पडल्या नाहीत. ठराव कधी बहुमताने पारित झाले नाहीत. शिवस्वराज्य दिनी महिला सरपंच, सदस्य व ग्रामसेविकाचे प्रोसेडिंग बुकवरून भर रस्त्यावर महाभारत घडले. सरपंच व ग्रामसेविकासह सहा पदाधिकारी गुन्ह्यात अडकले. ॲट्रॉसिटी लागल्याने माहिला सरपंच व सदस्य फरार झाले. पोलिसांचे पथक शोध घेत आहेत. फरार आरोपींना अटक करण्यासाठी ग्रामसेवक संघटना समोर आली आहे. ॲट्रॉसिटी गुन्हा रद्द करण्यासाठी सरपंच संघटना निवेदन देऊन परतली आहेत. प्रोसिडिंग बुकवरून मारहाण झाली. पैशाची देवाण-घेवाण याच बुकमध्ये होती, परंतु कधी विकासाच्या मुद्द्यावर सदस्य भांडताना दिसले नाहीत. पावसाळा तोंडावर असताना कामांना सुरुवात झाली नाही. मारहाणीच्या घटनेनंतर अन्य पदाधिकारी ग्रामपंचायतीमध्ये पोहोचले नाहीत. उपसरपंच व सदस्य प्रतिक्रिया देत नाहीत. गावच्या ग्रामपंचायतीच्या अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात नोंद आहेत. अनेक प्रकरणे चर्चेत आली आहेत. भांडणाची ग्रामपंचायत म्हणून जिल्ह्यात गाजली आहे.
मारहाणप्रकरणी सरपंच व ग्रामसेवक संघटना आमने-सामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 4:24 AM